वडिलांच्या मदतीचे वैष्णवीचे स्वप्न अधुरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

टाकळघाट - दहावीचा शेवटचा पेपर देऊन मनात आनंद व भविष्याची स्वप्ने पाहत सायकलने परत येणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील गेट क्रमांक ६ जवळ घडलेल्या या घटनेत स्वप्नांचा अंत झाला. वैष्णवी राजेंद्र ढवळे (वय १७,  रा. टेंभरी) हिने वडिलांनी घरासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याचा निर्धार केला होता. 

टाकळघाट - दहावीचा शेवटचा पेपर देऊन मनात आनंद व भविष्याची स्वप्ने पाहत सायकलने परत येणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील गेट क्रमांक ६ जवळ घडलेल्या या घटनेत स्वप्नांचा अंत झाला. वैष्णवी राजेंद्र ढवळे (वय १७,  रा. टेंभरी) हिने वडिलांनी घरासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याचा निर्धार केला होता. 

वैष्णवीच्या वडिलांची परिस्थिती बेताची आहे. ते एमआयडीसीतील इंडोरामा कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. वडील राजेंद्र, लहान भाऊ प्रज्वल यांच्यासोबत राहणाऱ्या वैष्णवीची आई काही कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून माहेरी गेली आहे. यामुळे घरकाम व भावाला सांभाळून ती दहावीचा अभ्यास करीत होती. श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने विद्यालयात इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीला दहावी बोर्ड परीक्षेसाठी टाकळघाट येथील अमर हायस्कूल केंद्र मिळाले होते. गुरुवारी दहावी परीक्षेचा तिचा  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा शेवटचा पेपर सोडवून ती घरी जात होती. दहावीची परीक्षा संपताच तिने वडिलांना मदत करण्यासाठी नोकरी करायची, असा संकल्प केला होता. 

इंडोरामा कंपनीनजीकचे वळण पार केल्यावर कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या रूपाने मृत्यूने तिच्यावर घाला घातला अन्‌ क्षणार्धात सारी स्वप्ने धुळीस मिळाली. सायकल अडकल्याने काही अंतर ती फरपटत गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिच्यावर हिंगणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

असा सापडला ट्रकचालक 
ओव्हरटेक करताना विद्यार्थिनीला धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. जमाव शांत झाल्यावर टाकळघाट परिसरातील युवक विनायक कावले, गोलू वानखेडे, रितेश सुरजुसे, अंकित वांढरे यांनी पोलिसांसमवेत ट्रकचालकाचा शोध घेतला. रिलायन्स कंपनीजवळ अपघातग्रस्त सायकल काढून फेकल्याचे दिसले. माहिती घेतल्यावर कंपनीत आलेल्या एका ट्रकमधून काढल्याचे समजले. यावरून उमेश जंगली महतो (वय ६०) या ट्रकचालकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अपघात झाल्याची कबुली दिली. 

गतिरोधक लावण्याची मागणी 
वैष्णवीचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका ट्रेलरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला होता. रिलायन्स कंपनीला लागणारा कोळसा चिमूर तालक्‍यातून ट्रकने आणला जात असल्याने येथे मोठी वर्दळ असते. याठिकाणी अनेक लहान मोठे अपघात होतच असतात. यामुळे येथे गतिरोधक लावावे, अशी मागणी घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने पोलिसांकडे केली.

Web Title: nagpur news accident