उपवास झाला महाग! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - आषाढी एकादशीनिमित्त बाजारपेठ सज्ज झाली असली तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या भावात किंचीत वाढ झाली आहे. बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांची आवक जास्त असून भाव वाढल्याने मागणी कमी आहे. महिन्याच्या प्रारंभीच एकादशी आल्याने ग्राहकांची बाजारात वानवा आहे. 

नागपूर - आषाढी एकादशीनिमित्त बाजारपेठ सज्ज झाली असली तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या भावात किंचीत वाढ झाली आहे. बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांची आवक जास्त असून भाव वाढल्याने मागणी कमी आहे. महिन्याच्या प्रारंभीच एकादशी आल्याने ग्राहकांची बाजारात वानवा आहे. 

आषाढीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे विविध पदार्थ बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, या वस्तू मागील वर्षाच्या तुलनेत काही वस्तू महाग तर काही स्वस्त झाल्या आहेत. एक किलो साबुदाणा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ८८ रुपये मोजावे लागत आहेत. तर, शेंगदाणे ११२ रुपये किलोप्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत. या शिवाय भगर, साबुदाणा चिवडा, खजूर, बटाटा चिवडा, राजगिरा लाडू असे विविध पदार्थ बाजारामध्ये उपलब्ध असून त्यांच्याही दरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत थोडी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी साबुदाणा ८४ रुपये किलो होता, त्यात चार रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. शेंगदाणे १०७ रुपये किलो होते, त्यात पाच रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. यामुळे उपासाचे साहित्य खरेदी करण्यासाठी थोडा खिसा हलका होणार आहे. मात्र, एक जुलैपासून जीएसटी लागणार असल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही अनिश्‍चिततेचे वातावरण होते. त्यामुळे बाजारात ग्राहकांचा वानवा होती. परिणामी, बाजारात शांतता आहे, असे किराणा व्यापारी प्रकाश जैस यांनी सकाळला सांगितले.  आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सर्वच उपासाचे पदार्थ विक्रीचे स्टॉल लागले आहेत. फळविक्रेत्यांसोबतच खजूर, रताळे, भुईमुगाच्या शेंगा असे विविध पदार्थ बाजारात आले आहेत. 

फळांच्या भावातही वाढ
आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी मोठा उत्सव. या एकादशीला भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. परंतु, ज्यांना आपल्या कामामुळे पंढरपूरला जाणे शक्‍य नाही, असे भाविक एकादशी भक्तिभावाने साजरी करतात. या दिवशी अनेकजण उपवास करतात. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठदेखील सज्ज झाली आहेत. फळाच्या भावातही दहा टक्के वाढ झालेली आहे. ग्राहकांकडून त्याला अधिक मागणी आहे.

Web Title: nagpur news Ashadhi Ekadashi