ढवळ्या-पवळ्यांची संख्या घटली अन्‌ पोळाही रोडावला!

नीलेश डोये
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती

नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने काळ्या मातीची सेवा करून शेती पिकवायची, त्या बैलांप्रति आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यातील ढवळ्या-पवळ्यांच्या जोड्या लांबच लांब पोळ्यात उभा रहायच्या. पण आता अनेकांचे गोठे ओस पडलेच. बैलजोड्यांची संख्या घटली. परिणामी पोळाही रोडावल्याचे विदारक चित्र आता दिसू लागले आहे. कर्जबाजारीपणा, शेतीत वाढलेला यंत्रांचा वापर अशा विविध कारणांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

बैल हे शेतकऱ्यांचे खरे साथीदार. त्यांच्या भरोशावर शेतीची कामे होतात. पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना सजवून त्यांची पूजा करतो. पण, महागाईमुळे बैलजोडी पोसणे अशक्‍य झाले आहे. काहींनी कर्जबाजारीपणामुळे बैल विकले, तर काहींनी ठेक्‍याच्या शेतीत बैलांऐवजी यंत्रांचा वापर वाढवला. 

शेतीसाठी किमान एक बैलजोडी आवश्‍यक असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता अडीच लाखांच्यावर बैलांची आवश्‍यक आहे. मात्र, प्रत्यक्षात सव्वा ते दीड लाखच बैल आहेत. काहींकडे दोन बैलजोड्या आहेत, तर अनेकांकडे एकही बैल नाही. जिल्ह्यात पाच लाख ९९ हजार मोठी जनावरे आहेत. यात जवळपास २ लाख ८६ हजार गावठी गायी आणि बैल आहेत. बैलांची संख्या गायीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येते. संकरित जनावरांची संख्या ६२ हजारांच्यावर आहे. तर म्हशी ७१ हजारांच्यावर आहेत.

जिल्ह्यात पाच लाख हेक्‍टरच्यावर शेती आहे, तर  सव्वा लाखापेक्षा अधिक शेतकरी खातेदार असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त लोक शेती करीत असल्याचा अंदाज आहे. मात्र त्यातुलनेत बैलजोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

पोळा हा आमच्यासाठी मोठा सण आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजविण्यात येते. ज्यांच्याकडे बैल नाही, ते मातीच्या बैलाची पूजा करतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाही, त्यांच्यासाठी दरवर्षी भावनिक प्रसंग असतो.
- होमेश सातपुते, शेतकरी

येत्या काही वर्षांमध्ये बैल फक्त चित्रातच पाहावे लागतील आणि बैलाऐवजी ट्रॅक्‍टरची पूजा  करावी लागेल. ट्रॅक्‍टर खरेदी करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून त्यावर अनुदानही देण्यात येते. त्याचप्रमाणे बैलजोडी घेण्यासाठी अनुदानासह बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. 
- विजय जावंधिया, शेतकरी नेते

Web Title: nagpur news bail pola celebration