अखेर ‘बीन फ्री सिटी’चे भूत उतरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर - ‘बीन फ्री सिटी’ या वैशिष्ट्यांसह मिरविणाऱ्या महापालिकेला नागरिकांच्या कुठेही कचरा टाकण्याच्या सवयीमुळे अखेर माघार घ्यावी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात घराघरांतून कचरा गोळा केला जात असल्याने रस्त्यांवर डस्टबिन ठेवण्याची गरजच संपुष्टात आणली होती. मात्र, नागपूरकरांनी महापालिकेचे हे भूत उतरविल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

नागपूर - ‘बीन फ्री सिटी’ या वैशिष्ट्यांसह मिरविणाऱ्या महापालिकेला नागरिकांच्या कुठेही कचरा टाकण्याच्या सवयीमुळे अखेर माघार घ्यावी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात घराघरांतून कचरा गोळा केला जात असल्याने रस्त्यांवर डस्टबिन ठेवण्याची गरजच संपुष्टात आणली होती. मात्र, नागपूरकरांनी महापालिकेचे हे भूत उतरविल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

घराघरांतील कचरा गोळा करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी प्रत्येक मोहल्ल्यात कचरापेटी होती. नागरिकांनी घरातील कचरा त्यात टाकावा अन्‌ महापालिकेच्या वाहनांनी तो डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचवावा, ही नित्याची बाब होती. २००८ मध्ये घराघरांतून कचरा गोळा करण्यासाठी कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटला कंत्राट देण्यात आले. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचे हे पाऊल कौतुकास्पद होतेच, परंतु शहरातील विविध ठिकाणी लागलेल्या कचरापेटी महापालिकेने काढून घेतल्या. शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे जात महापालिकेने ही प्रक्रिया करून ‘बीन फ्री सिटी’ हे विशेषणही लावून घेतले.

घराघरांतून कचरा गोळा केला जात आहे. एवढेच नव्हे तर व्यावसायिक प्रतिष्ठानांकडूनही कचरा गोळा केला जातो. मात्र, रस्त्यांनी चालणारे, पादचारी यांनी कचरापेटी नसल्याने रस्त्यांवरच कचरा टाकण्यास प्रारंभ केला. अनेक भागांत कचरागाडी दररोज येत नसल्याने तेथील नागरिकांनी घरातील कचरा सध्या सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रावर टाकण्यास सुरुवात केली. कार्यालयात जाण्यापूर्वी कचरागाडी घरापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक जण सुटीच्या दिवशी कचरा टाकण्यासाठी कचरागाडीची प्रतीक्षा करतात. त्यांच्या सुटीच्या दिवशी कचरागाडी न आल्यास ते कार्यालयात जाताना कचरा संकलन केंद्रावर फेकून देत असल्याचे दृश्‍य दररोज दिसत आहे. बीन फ्री सिटीमुळे गेल्या काही वर्षात कचऱ्याची समस्या, विशेषतः रस्ते, बाजारांमध्ये या समस्येने तोंडवर केले.

नागरिकांच्या सवयीत कुठलाही बदल होण्याच्या आशा धूसर झाल्याने अखेर महापालिकेने पूर्वीप्रमाणेच शहरात डस्टबिन लावण्याचा निर्णय घेतला. आता मात्र कचरा विलगीकरणाच्या दृष्टीने या डस्टबिन लावण्यात येत आहेत.

प्रमुख रस्ते तसेच बाजाराच्या क्षेत्रात डस्टबिन लावण्यात येत आहे. रस्त्यांवरून चालणारे पादचारी, बाजारातील दुकानदारांनी यात कचरा टाकावा. काही भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने डस्टबिन लावण्यात आल्या नाही. मात्र, ही कामे झाल्यानंतर डस्टबिन लावण्यात  येतील. 
- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका.

१८०० ठिकाणी डस्टबिन 
कचरा विलगीकरणाच्या हेतूने निळ्या व हिरव्या रंगाच्या दोन डस्टबिन शहरातील १८०० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. मानेवाडा रोड, शंकरनगर ते लक्ष्मीभुवन चौक या मार्गासह आणखी  काही भागात २०० ठिकाणी डस्टबिन लावण्यात आल्या आहेत.

मोफत डस्टबिन योजना गुंडाळली
नागरिकांना मोफत डस्टबिन देण्याची योजना महापालिकेने गुंडाळली असून, सध्या महापालिकेकडे असलेल्या डस्टबिन नागरिकांना विक्री करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. 

Web Title: nagpur news bin free city municipal