भाजपचे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर - मुंबईत होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी गुरुवारी सुमारे पाच हजार कार्यकर्ते नागपूरमधून मुंबईकडे रवाना झालेत. अजनी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांची एक विशेष गाडी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निघाली.

नागपूर - मुंबईत होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी गुरुवारी सुमारे पाच हजार कार्यकर्ते नागपूरमधून मुंबईकडे रवाना झालेत. अजनी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांची एक विशेष गाडी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निघाली.

विशेष गाडीने आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. कीर्तिदा अजमेरा, माजी महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव, भाजयुमोच्या शहराध्यक्ष शिवानी दाणी, दिलीप गौर, जितेंद्र ठाकूर यांच्यासह सुमारे दोन हजार कार्यकर्ते होते. याशिवाय इतर कार्यकर्ते बस तसेच चारचाकीने निघाले. यात शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर आदींचा समावेश होता. रात्री आठ वाजताच्या दुरांतोने हजार कार्यकर्ते गेले. यात आमदार कृष्णा खोपडे, जयप्रकाश गुप्ता, चंदन गोस्वामी, प्रमोद पेंडके यांचा समावेश आहे. आमदार सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकुरेजा विमानाने मुंबईला गेले. विदर्भ, सेवाग्राम गाडीनेही शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.

दोन तास आधीच सोडली गाडी 
मुंबईला जाण्यासाठी विशेष गाडी करण्यात आली होती. ती अजनी रेल्वे स्थानकावरून साडेदहा वाजता सोडण्यात येणार होती. सर्व कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाने सकाळी ८ वाजून १८ मिनिटे झाले असताना गाडी सोडली. त्यात फक्त ३२ कार्यकर्ते होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर गाडी परत बोलवण्यात आली. यामुळे तब्बल सुमारे चार तास खोळंबा झाला. कार्यकर्त्यांचे हाल झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर कुठलीच व्यवस्था नव्हती. पाणीसुद्धा उपलब्ध नव्हते, अशा तक्रारीही कार्यकर्त्यांच्या आहेत.

नागपूरमार्गे धावल्या सहा विशेष ट्रेन
कार्यकर्त्यांच्या सुविधेसाठी नागपूरमार्गे एकूण सहा रेल्वे धावल्या. गोंदिया, भंडारा रोडहून वेळेत गाड्या सुटल्या. अजनी स्थानकावरून एकूण तीन गाड्या सुटल्या. त्यातील दोन वर्धा आणि बल्लारशा येथून कार्यकर्त्यांना घेऊन पुढे रवाना झाल्या. नागपूर रेल्वेस्थानकावरून दुपारी साडेतीन वाजता विशेष ट्रेन रवाना झाली. प्रत्येक गाडीला १५-१६ स्लिपरचे डबे होते. पण, प्रत्येक गाडीत क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते बसविण्यात आल्याची ओरड कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आली.

रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पूर्वीच केले होते. पण, वेळेबाबत संबंधितांना कळविण्याची सर्वस्वी जबाबदारी आयआरसीटीसीची होती. विसंवादातून वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला. प्रवासी वेळेत पोहोचले नसले तरी वेळेत गाडी सोडण्यात आली. अडचण लक्षात घेऊन अजनीची गाडी वर्धेसाठी आणि वर्धेची गाडी अजनीतून सोडून सहज तोडगा काढण्यात आला.
- के. के. मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक.

Web Title: nagpur news BJP Activists go to mumbai