ब्रह्मपुरीची वाघीण ‘साखळीबंद कुंपणात’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नागपूर - ब्रह्मपूरी वन परिक्षेत्रात जेरबंद केलेल्या वाघिणीला व्याघ्र दिनाच्या दिवशी बोर व्याघ्र प्रकल्पात तयार केलेल्या साखळी दुवा कुंपणात सोडण्यात आले. आता तिला थेट आहार देण्यात येणार असून, तिची वागणूक कशी आहे, हे तपासल्यानंतर जंगलात मुक्त केले जाणार आहे.

नागपूर - ब्रह्मपूरी वन परिक्षेत्रात जेरबंद केलेल्या वाघिणीला व्याघ्र दिनाच्या दिवशी बोर व्याघ्र प्रकल्पात तयार केलेल्या साखळी दुवा कुंपणात सोडण्यात आले. आता तिला थेट आहार देण्यात येणार असून, तिची वागणूक कशी आहे, हे तपासल्यानंतर जंगलात मुक्त केले जाणार आहे.

दोन वर्षे वयाची ही वाघीण आहे. गावकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे वाघिणीला सोडण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता झाली होती. त्यामुळे या वाघिणीबाबतही पेंच मध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती तर घडणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील जेरबंद वाघिणीच्या सुटकेसंदर्भात गठित समितीने सकारात्मक अहवाल सादर केला. त्यानंतरच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी तीच्या सुटकेचे आदेश दिले. बोर व्याघ्रप्रकल्पात तिला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिकांना बोलावण्यात आले. वाघिणीच्या सुटकेची तयारी झाल्यानंतर संस्थेचे वैज्ञानिक  डॉ. बिलाल हबीब, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत कामडी आणि संपूर्ण चमू नागपुरात आली. बचाव केंद्रातील पशुवैद्यक अधिकारी डॉ. विनोद धूत यांनी आरोग्य तपासणी अहवाल दिला. मात्र, नवरगाव येथील गावकऱ्यांनी विरोध केल्याने तिला सोडण्याची प्रक्रीया थोडी संथ केली होती. शुक्रवारी (ता.२८) रात्रीपासूनच पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. दुपारच्या सुमारास तिला सोडण्यात आले. आता त्यावर भारतीय वन्यजीव संस्थेची चमू नजर राहणार आहे.  या वाघिणीला नवरगावजवळील साखळी दुवा कुंपणात रेडीओ कॉलर लावून सोडण्यात आल्याची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी दिली. मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक ए. पी. माळभुशी, वन परीक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धुत यांनी ही जबाबदारी पार पाडली.

प्रतिनिधी अनुपस्थित 
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत कामडी वाघिणीला मुक्त करण्याच्या वेळेस उपस्थित नसल्याने त्यांना वन विभागाने विश्‍वासात न घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: nagpur news Brahmapuri Forest Range Waggan