लाखोंच्या कलाकृती अखेर सीसीटीव्हीच्या निगराणीत

नितीन नायगावकर 
मंगळवार, 11 जुलै 2017

नागपूर - देशभरातील लोककलावंतांच्या मेहनतीतून साकारलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील लाखोंच्या कलाकृती अखेर सोमवारपासून (ता. १०) सीसीटीव्हींच्या निगराणीत आल्या आहेत. केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची बाब दै. ‘सकाळ’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली. ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. चार एकरांच्या परिसरावर तब्बल १६ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

केंद्र सरकारने ३० वर्षांपूर्वी देशभरात सात सांस्कृतिक केंद्रांची स्थापना केली. नागपुरातील केंद्र सिव्हिल लाइन्स येथे सुरू केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या नावाने नागपुरात सुरू झालेल्या या विभागाच्या अखत्यारित सुरुवातीला चार राज्ये होती. मात्र, गेल्या वर्षीपर्यंत हा व्याप सात राज्यांपर्यंत पोहोचला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हैदराबाद, तेलंगण आणि गोवा या सात राज्यांचा कारभार नागपुरातून चालतो.

देशभरातील सर्वच केंद्रांची मुख्यालये लोककलावंतांच्या शिल्प कलाकृतींनी सजली. याचाच विचार करून केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणाने प्रत्येक मुख्यालयी सीसीटीव्ही अनिवार्य  असल्याचे आदेश दिले. मात्र, नागपूरचे दक्षिण मध्य वगळता जवळपास सर्वच केंद्रांमध्ये याची दखल घेतली. केंद्रात यापूर्वी पेंटिंग चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतरही सुरक्षेची कुठलीच पावले उचलण्यात आली नाही.

चोरीच्या अफवांनी ‘सकाळ’ने सुरक्षेचा मुद्दा वृत्त मालिकेतून लावून धरला. याची दखल घेऊन प्रभारी संचालक डॉ. साजिथ यांनी तातडीने सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले. डॉ. साजिथ यांच्याकडे तंजावर (तमिळनाडू) येथील दक्षिण विभागाचा मुख्य कारभार आहे. त्यांनी फार पूर्वीच तंजावर येथील केंद्रात सीसीटीव्ही लावले. मात्र, नागपूरची अवस्था बघून त्यांना आश्‍चर्य वाटले आणि कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सोमवारी केंद्राचा परिसर सोळा कॅमेरांनी व्यापण्यात आला. यामध्ये खुला रंगमंच, लॉन, सभागृह आदींचा समावेश आहे. त्याचे नियंत्रण व निरीक्षण प्रशासकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्याकडे असणार आहे.

सीसीटीव्ही फार पूर्वीच लागायला हवे होते. केंद्राच्या परिसरातील महागड्या कलाकृतींच्या सुरक्षेसाठी ते आवश्‍यक होते. आता परिसर कॅमेराच्या निगराणीत असल्यामुळे अप्रिय घटना घडणार नाही, असा विश्‍वास आहे.
- सुदर्शन पाटील, प्रशासकीय अधिकारी, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र.

Web Title: nagpur news cctv camera