आता चालान भरा ‘ऑन दी स्पॉट’

अनिल कांबळे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

दंडात्मक कारवाईपेक्षा शहरातील वाहतूक व्यवस्था व नियंत्रणावर भर देण्यात येणार आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणेच वाहतूक पोलिस विभागसुद्धा डिजिटल धोरणाची अंमलबजावणी करीत आहेत वाहनचालकांना त्वरित दंड भरण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून मोबाईल ॲप तसेच स्वाइप मशीन वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
-रवींद्रसिंग परदेशी, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक शाखा)

राज्यातील पहिला उपक्रम - स्वाइप मशीन आणि मोबाईल ॲप लवकरच

नागपूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर जर वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती फाडली असल्यास किंवा घरी ई-चालान आल्यास ते भरण्यासाठी आता बॅंक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. वाहतूक पोलिसही आता अपडेट झाले असून डिजिटल चालान पद्धतीचा वापर करणार आहेत. वाहतूक विभाग लवकरच ‘मोबाईल ॲप’ तयार करीत आहे. सोबतच वाहतूक पोलिसांच्या हाती आता थेट ‘स्वाइप मशीन’ असणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लगेच दंड भरता येणार आहे. ही सर्व सुविधा वाहनचालकांच्या सोयीसाठी केली आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून नागपुरात त्याचा श्रीगणेशा होत आहे. 

शहरात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ आणि वाहतूक शाखेचे उपायुक्‍त रवींद्रसिंग परदेशी प्रयत्नरत आहेत. वेगवेगळे अभियान आणि उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. यामध्ये मोबाईलने फोटो काढून ‘ई-चालान’ पाठवणे. थेट दंड न स्वीकारता बॅंक किंवा पोस्ट खात्यात भरण्याची सुविधा देणे. तसेच हेल्मेट सक्‍तीसाठी कॉलेज आणि गर्दीच्या रस्त्यावर ड्राइव्ह राबविण्यात येत आहेत.

शहरात ‘सकाळ’ने सुचविलेला ‘धंतोली पॅटर्न’ आता धरमपेठ आणि अन्य ठिकाणी राबवून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येत आहे. 
स्वतः पोलिस आयुक्‍त रस्त्यावर उभे राहून वाहतूक व्यवस्था सांभाळत आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. परिणामतः अपघातांच्या घटना होणार नाहीत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आता मोबाईल ॲप आणि स्वाईप मशीनचा वापर करणार आहेत. त्यामुळे दंड ठोठावलेल्या वाहनचालकांना दंड भरण्यास सोयीचे होणार आहे. 

मोबाईल ॲपमुळे दंड ठोठावलेल्या ठिकाणीच दंड भरता येणार आहे. एटीएम कार्ड असल्यास स्वाइप मशीनद्वारे ताबडतोब दंड भरता येणार आहे. 
ही सुविधांचा वापर करणारे नागपूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरणार आहे. 

Web Title: nagpur news challan paid on the spot