स्वच्छता गेली उडत!

स्वच्छता गेली उडत!

नागपूर - स्वच्छ शहर मानांकनात संत्रानगरीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथकाची नियुक्ती केली. मात्र, या पथकाला अतिक्रमण हटविण्याचीही कामे देण्याचा अजब सल्ला देत आरोग्य सभापती मनोज चापले यांनी अधिकाऱ्यांनाही आश्‍चर्यात टाकले. यामुळे चापले यांचे स्वच्छतेबाबत गांभीर्य लक्षात आल्याचा टोला बैठकीनंतर काही अधिकाऱ्यांनी हाणला.

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची बैठक गुरुवारी महापालिकेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. बैठकीत उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्य भावना लोणारे, वंदना चांदेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग विभागप्रमुख जयश्री थोटे होते.

नगरसेवक मनोज सांगोळे यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वाढविण्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, चापले यांना स्वच्छतेचे गांभीर्यच कळले नसल्याचे दिसून आले. नागपूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात कचरा करणाऱ्या उपद्रव मूल्यांवर वचक ठेवण्याच्या हेतूने उपद्रव शोधपथकाची स्थापना केली. यामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचाही अधिकार द्यावा, अशी सूचना आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी करताच अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.

स्वच्छतेसाठी आधीच तोकडे मनुष्यबळ असून, नगरसेवकांची ओरड सुरू आहे. अशा स्थितीत स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त उपद्रव शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी इतर कामे कशी देणार? अशी कुजबूज अधिकाऱ्यांत सुरू झाली. अधिकाऱ्यांचा ही कुजबूज सुरू असतानाच बैठकीत कनक रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीला दिलेल्या कंत्राटाबद्दल चर्चा केली. कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी समितीला सूचित करावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. नगरसेवक मनोज सांगोळे यांच्या प्रश्‍नावर आरोग्य अधिकारी डॉ. दासरवार यांनी कर्मचारी भरती प्रक्रिया ही प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. मनपाच्या दवाखानात डॉक्‍टर्सचे वेळापत्रक दर्शनी भागात लावावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले.

४७ कर्मचारी रुजू
मनपाद्वारे नियुक्त केलेल्या उपद्रव शोधपथकातील ८७ पैकी ४७ कर्मचारी रुजू झाले आहेत. प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी चार असे कर्मचारी सद्यस्थितीत नेमले आहेत. त्यांच्याकडे पावती पुस्तकासोबत उपद्रवासंबंधी दंड आकारणीची यादीही दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com