स्वच्छतेसाठी आयुक्त उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर - कचरा, घाणीबाबत महापालिकेकडे स्वच्छता ॲपद्वारे तत्काळ तक्रार करून तत्परतेने संबंधित ठिकाण स्वच्छ करणे शक्‍य आहे. परंतु, अनेकांना स्वच्छता ॲपचे महत्त्वच पटले नसल्याने मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी आज सुटीच्या दिवशीही सायंकाळी रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना स्वच्छता ॲपचे महत्त्व पटवून दिले. परिणामी सायंकाळी काही तासांमध्येच अडीचशेवर नागरिकांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करून त्याचा  वापर करण्याची ग्वाही दिली. 

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी पुढील काही दिवसांत केंद्राचे पथक येणार असून शहराच्या सभोवताली स्वच्छतेची पाहणी करणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणात शहर मागे पडू नये, यासाठी आयुक्तांनी स्वच्छता ॲम्बेसॅडरची नियुक्ती केली. आज सायंकाळी स्वच्छता ॲम्बेसॅडर डॉ. उदय बोधनकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, माय एफएमची आरजे निकेता साने यांच्यासह धरमपेठ परिसरातील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क भागात नागरिकांसोबत त्यांनी चर्चा केली. या वेळी त्यांच्या समवेत उपायुक्त जयंत दांडेगावकर उपस्थित होते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच स्वच्छ सर्वेक्षणात शहराला गुण मिळवून देण्यासाठी ॲप डाउनलोड करणे, त्यावर तक्रार करणे आणि आपला अनुभव ॲपवरच शेअर करणे याबाबत त्यांनी तसेच स्वच्छता ॲम्बेसॅडरनी नागरिकांना मार्गदर्शन केले. ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कमध्ये येणाऱ्या पालकांना सांगितले. ॲप डाउनलोड करणे, त्यावर तक्रार  करणे आणि अनुभव ॲपवरच शेअर केल्यास वेगवेगळे गुण शहराला मिळणार असून स्वच्छ शहराच्या यादीत मानाचे स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. अडीचशेवर नागरिकांनी यावेळी ॲप डाउनलोड केलेच.

शिवाय स्वतः आयुक्तांनी स्वच्छतेसंदर्भातील समस्या जाणून घेतल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, विभागीय अधिकारी स्वच्छता डी. पी. टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक मनीष शुक्‍ला, राजेंद्र शेट्टी, साजन डागोर यांच्यासह ग्रीन व्हिजिल संस्थेचे स्वयंसेवक सुरभी जयस्वाल, बिष्णूदेव यादव, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विकास यादव, अभय पौनिकर, दादाराव मोहोड यांच्यासह आदींनी नागरिकांकडून स्वच्छता ॲप डाउनलोड करून घेतले.

Web Title: nagpur news Commissioner for the cleanliness came down on the road