पेट्रोल, गॅस दरवाढीविरुद्ध काँग्रेसचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नागपूर - पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे दर नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारविरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात रास्ता रोको केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. पोलिसांनी विरोध केल्याने कार्यकर्ते व पोलिसांत वादही निर्माण झाला.

नागपूर - पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे दर नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारविरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात रास्ता रोको केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. पोलिसांनी विरोध केल्याने कार्यकर्ते व पोलिसांत वादही निर्माण झाला.

शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनात शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईसाठी जबाबदार सरकारविरोधात घोषणाबाजी केली. उन्हात तासभर मोदी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार  मुर्दाबाद,  फडणवीस सरकार मुर्दाबाद, तानाशाही सरकार मुर्दाबाद, वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल या घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

घोषणा व नेत्यांच्या भाषणानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे कठडे मागे टाकून  रस्त्यांवर आंदोलन केले. पंधरा मिनिटे रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखल्याने संविधान चौक ते झीरो माईल चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी कापडाचा तयार केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते-पोलिस असा संघर्ष झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांना विसर पडल्याचा आरोप नेत्यांनी केला. मोदी सरकार केवळ अदानी-अंबानीचे असून, सामान्य नागरिकांना भूलथापा देऊन सत्तेवर आल्याचा आरोपही केला.

यावेळी उमाकांत अग्निहोत्री, ॲड. अभिजित वंजारी, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, सेवादलचे रामगोविंद खोब्रागडे, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, धरमकुमार पाटील, रमण  ठवकर, अतुल कोटेचा, जयंत लुटे, डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, पंकज थोरात, वासुदेव ढोके, सरस्वती सलामे, नगरसेविका दर्शनी धवड, ॲड. रेखा बारहाते, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, कांता पराते, माजी नगरसेविका शीतल घरत, सुजाता कोंबाडे, पंकज लोणारे, गुड्डू तिवारी, अनिल पांडे, नितीन सोनटक्के, उमेश शाहू यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी होते.

मोदी, फडणवीस खोटारडे
जनतेसमोर दिलेली आश्‍वासनांची पूर्तता करण्याची क्षमता नसल्याने आता ते ‘जुमले’ असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगत आहे. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार नरेंद्र मोदी, फडणवीस सरकारचा खोटारडेपणा उघड झाल्याचा आरोप माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकाळात आंतराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे दर जास्त असूनही नागरिकांना त्याची झळ पोहोचू दिली नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असतानाही ८० रुपये दराने सामान्य नागरिकांना पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. हे सरकार जनविरोधी असल्याचा घाणाघात त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते वनवेंची आंदोलनाला दांडी
महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या आंदोलनाला मारलेली दांडी सर्वांसाठी आश्‍चर्याचा धक्का होती. सत्ताधारी ऐकत नसेल, तर नागरिकांच्या  अपेक्षा विरोधी पक्षनेत्यांकडून वाढतात. परंतु, वनवे यांनी सामान्य नागरिकांच्या अपेक्षांनाही  धक्का दिल्याची चर्चा यानिमित्त महापालिका वर्तुळात रंगली होती. याबाबत तानाजी वनवे यांना विचारणा केली असता त्यांनी आंदोलनासाठी रीतसर निमंत्रण नव्हते, असे सांगितले. त्यामुळे आंदोलन केवळ मोजक्‍या नेत्यांचेच होते की काँग्रेसचे, असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. वनवे यांच्याशिवाय शहरातील अनेक काँग्रेस नेतेही गैरहजर होते.

Web Title: nagpur news congress