विधान परिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

नागपूर - नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्‍यता आहे. याबाबत २१ नोव्हेंबरला चर्चा होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नमूद केले. 

काँग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता खासदार चव्हाण यांना पत्रकारांनी आघाडीबाबत विचारले असते ते बोलत होते. नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या परिषदेच्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. भाजपच्या पाठबळावर नारायण राणे निवडणूक लढविणार अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या एकत्रित संख्याबळामुळे राणे संभ्रमात असून मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. परंतु, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीही वेगवेगळे लढल्यास ही निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे आघाडीसाठी २१ तारखेला दोन्ही पक्षांतील नेत्यांत चर्चा होणार आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१, शेकाप - ३, बविआ - ३, एमआयएम - २, अपक्ष - ७, सपा -१, मनसे - १, रासपा - १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -१ असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मतांची एकूण बेरीज १४६ एवढी होते. तसेच अपक्षांसह काही छोटे पक्षही या पक्षांसोबत जाण्याची शक्‍यता आहे. 

राणेंची कोंडी?
एकट्या भाजपकडे १२२ मते असली, तरी १४५ मतांचा आकडा गाठणे भाजपसाठी अवघड आहे. नारायण राणे यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Web Title: nagpur news congress NCP ashok chavan