‘नॉट फॉर सेल’ कॉटनची विक्री

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

अधिष्ठाता अनभिज्ञ
‘नॉट फॉर सेल’ लिहिलेले कॉटन बंडल खासगी ड्रग स्टोरमधून विक्री करून बिलेही दिले जात असल्याच्या गोरखधंद्याची मागिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना नाही. यासंदर्भात चौकशीनंतर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बीपीएलग्रस्त असो की, मनोरुग्ण यांना मोफत औषधं दिली जात नाही. मात्र, रुग्णाच्या वापरासाठी दर करारावर खरेदी केलेला कॉटन चक्क ‘मेडिकल कॉलेज ॲण्ड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या खासगी ड्रग स्टोरमधून विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शहनाज बेगम या रुग्णाला सरकारी मेडिकलमधील कॉटन खासगी ड्रग स्टोरमधून विकण्यात आले आहे. सरकारी कॉटन  बंडल विकत असताना ड्रग स्टोरतर्फे बिल देण्यात आले. यामुळे हे प्रकरण उजेडात आले. मात्र, हे प्रकरण दाबण्यासाठी मेडिकलमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत.

मेडिकलमध्ये दर करारावर कॉटन खरेदीचे कंत्राट एबर्सोबेंट कॉटन वुल (आय पी) कंपनीला दिले आहे. दर करारावरील ५०० ग्रॅम कॉटन बंडलचा पुरवठा कंपनीने केला. बंडलवर ‘नॉट फॉर सेल’ असे स्पष्ट उल्लेख आहे. डॉक्‍टरांनी २९ ऑक्‍टोबरला प्रीस्क्रिप्शन लिहून दिले. त्यानुसार, शहनाज बेगम  ‘मेडिकल कॉलेज ॲण्ड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या खासगी ड्रग स्टोरमध्ये गेल्या. त्यांना १८० रुपये किमतीचे ५०० ग्रॅमचे बंडल दिले गेले. त्यांनी हे बंडल वापरासाठी दिले. परंतु, या बंडलवर ‘नॉट फार सेल’ असे स्पष्ट लिहून असल्यामुळे शंका आली. किडनी युनिटमध्ये एका परिचारिकेलाही हे दाखविण्यात आले. यातून हा प्रकार पुढे आला. मेडिकलमधील कॉटन ‘मेडिकल कॉलेज ॲण्ड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या खासगी ड्रग स्टोरमध्ये कसे पोहोचले, असा प्रश्‍न पडला. विशेष असे की, या ड्रग स्टोरचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य मेडिकलमधील डॉक्‍टर असतात. येथील डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्यापासून साऱ्यांचे ड्रग स्टोरमध्ये संबंध असतात. मेडिकलच्या औषधालयातील कर्मचाऱ्यांचेही संबंध असावेत, अशी शंका येत आहे. 

Web Title: nagpur news Cotton Sale