न्यायालयाच्या दणक्‍याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. सुरुवातीला गिट्टीखदान पोलिसांनी बॅंकेच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती.

नागपूर - आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. सुरुवातीला गिट्टीखदान पोलिसांनी बॅंकेच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती.

राकेश व मंदा बोरकर यांनी वाहन खरेदीसाठी संयुक्तपणे १३ लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. डिमांड ड्राफ्ट मिळाल्यानंतर बोगस कागदपत्रांच्या आधारे कार विक्रेत्याच्या नावाने बॅंक खाते उघडले. खात्यात जमा झालेली रक्कम त्यांनी काढली. मात्र, त्या रकमेतून कार खरेदी केली नाही. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्यांनी वाहनाची कागदपत्रे बॅंकेला सादर केली नाहीत. प्राथमिक चौकशीनंतर आरोपींनी बॅंकेची फसवणूक केल्याचे उघड झाले. यामुळे बॅंकेने ८ सप्टेंबर २०१६ रोजी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तक्रारीची दखल घेतली नाही.

परिणामत: बॅंकेने जेएमएफसी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करून पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. तिथे तांत्रिक कारणांवरून ३० नोव्हेंबर २०१६ रोजी तक्रार खारीज केली. त्यानंतर बॅंकेने सत्र न्यायालयात रिव्हिजन याचिका दाखल केली. ती याचिका ५ मे २०१७ रोजी फेटाळली. अखेर बॅंकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. 

उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना गिट्टीखदान पोलिसांनी १० सप्टेंबर २०१७ रोजी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविला. पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे न्यायालयाने बॅंकेची मागणी पूर्ण झाल्याचे निरीक्षण नोंदवून संबंधित याचिका निकाली काढली.

Web Title: nagpur news court