वेदप्रकाश मिश्रांची पुन्हा न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात साहित्य चौर्यकर्म केल्याचा आरोप असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी याप्रकरणात तांत्रिक कारणांमुळे खारीज झालेला दावा पुनरुज्‍जीवित करण्यासाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावत उत्तर सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला.

डॉ. मिश्रा सध्या कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती आहेत.  त्यांनी नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवर तब्बल ४० वर्षे कार्य केले. त्यांनी १९६९ मध्ये प्रकाशित आर. व्ही. राव यांच्या पुस्तकांतून उचलेगिरी करून गांधी विचारधारा पदविका अभ्यासक्रमातील शोधप्रबंध तयार केला असा आरोप तत्कालीन सिनेट सदस्य डॉ. रामभाऊ तुपकरी यांनी केला होता. आरोपाच्या चौकशीकरिता न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने जुलै-१९९२ मध्ये अहवाल सादर करून मिश्रा यांच्यावर चौर्यकर्माचा ठपका ठेवला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या कार्यकारिणीने १९ ऑक्‍टोबर १९९२ रोजीच्या बैठकीत अहवाल मंजूर करून मिश्रा यांच्यावर समितीच्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध मिश्रा यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. 

२२ ऑक्‍टोबर १९९२ रोजी दिवाणी न्यायालयाने याप्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यामुळे २०१३ पर्यंत मिश्रा यांच्यावर कोणतीच कारवाई करता आली नाही. दरम्यान, न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०१३ रोजी तांत्रिक कारणामुळे मिश्रा यांचा दावा फेटाळून लावला. परंतु, नागपूर विद्यापीठाने त्यावर पुढे काहीच केले नाही. हे प्रकरण आता नव्याने चर्चेत आल्यामुळे आणि विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे मिश्रा यांनी संबंधित दावा पुनर्जीवित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. मिश्रा यांच्यातर्फे ॲड. घरोटे तर, नागपूर विद्यापीठातर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: nagpur news court vedprakash mishra