फक्त 20 हजार रुपयांत पिस्तूल! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - केवळ 20 हजार रुपयांत नागपूरकरांना देशी बनावटीचे पिस्तूल विकणाऱ्या बिहारच्या विद्यार्थ्याला गजाआड करण्यात गिट्टीखदान पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पिस्तूल खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून लोखंडी देशी बनावटीच्या दोन पिस्तूल, चार मॅगझिन व एकूण 24 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. 

नागपूर - केवळ 20 हजार रुपयांत नागपूरकरांना देशी बनावटीचे पिस्तूल विकणाऱ्या बिहारच्या विद्यार्थ्याला गजाआड करण्यात गिट्टीखदान पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पिस्तूल खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून लोखंडी देशी बनावटीच्या दोन पिस्तूल, चार मॅगझिन व एकूण 24 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. 

अब्दुल मन्नन मोहम्मद रहमान (19) रा. मौजा बिसनूर, मकवा, जिल्हा मुंगेर, बिहार असे अटकेतील पिस्तूल विक्रेत्याचे नाव आहे. तो बीएससी प्रथम वर्गाचा विद्यार्थी आहे. मुंगेर येथून देशी बनावटीच्या पिस्तुलाची प्रत्येकी 15 हजार रुपये आणि प्रत्येकी 280 रुपये याप्रमाणे काडतूस खरेदी करून मध्यस्थामार्फत पिस्तूल 20 हजार व 350 रुपयांत काडतुसाची नागपुरात विक्री करतो. दरवेळी रेल्वेतूनच तो शस्त्रसाठ्याची तस्करी करतो. मन्नन बुधवारी रात्री 9.20 वाजता पिस्तूलविक्रीसाठी गिट्टीखदान हद्दीतील ग्वालवंशी याच्या निर्मलगंगा अपार्टमेंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 9.45 वाजता मन्नान येताच त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता एक पिस्तूल, 14 काडतुसे व दोन मॅगझिन आढळल्या. चौकशीत त्याने नागपुरात यापूर्वीही शस्त्रांची विक्री केल्याची माहिती दिली. पाचच दिवसांपूर्वी दीपक दारूवाला याला पिस्तूल विकले असल्याची कबुली देत त्याचा मोबाईल क्रमांकही दिला. त्यानुसार आज सकाळी शोधाशोध करून दीपक मन्सुरे (24) आणि हेमराज शेंडे (25) दोन्ही रा. जगदीशनगर यांना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दीपक हा दारूविक्री करते आणि त्याचा सेंट्रिंगचा व्यवसाय असून, हेमराज काचाचे काम करतो. पोलिसांनी हेमराज याच्या घरून एक पिस्तूल, 10 काडतुसे आणि दोन मॅगझिन जप्त केल्या. इतरांना विक्री करण्यासाठी दोघांनी पैसे जमा करून शस्त्र खरेदी केल्याची माहिती आहे. मन्नानने यापूर्वीही नागपुरात शस्त्रांची विक्री केली आहे. त्यासाठी सहकार्य करणारा बाबू चिनी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओला यांच्या मार्गदर्शनातील या कारवाईत गिट्टीखदानचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एन. वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक साजीद अहेमद, हेडकॉन्स्टेबल युवराज ढोले, शिपाई संतोष उपाध्याय, शेख आफताब, शेख इम्रान, आशीष यांचा समावेश होता. 

Web Title: nagpur news crime