नागपूरात भरदिवसा दरोडा; नऊ लाखांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - जवळपास नऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन जात असताना एका सराफाच्या डोळ्यांत तिखट फेकून त्यांना लुटण्यात आले. 

दुचाकीवरून दोघांनी सराफा दुकानदाराच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील वैशालीनगरात घडली.

नागपूर - जवळपास नऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन जात असताना एका सराफाच्या डोळ्यांत तिखट फेकून त्यांना लुटण्यात आले. 

दुचाकीवरून दोघांनी सराफा दुकानदाराच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील वैशालीनगरात घडली.

बंडू पांडुरंग कुंभारे (वय ५७, रा. हनुमान हाउसिंग सोसायटी, वैशालीनगर) असे लूटमार झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेमुळे पाचपावली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. बंडू कुंभारे यांचे वैशालीनगर चौकात आकाश ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. ते आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दुचाकीने सोन्याचांदीचे दागिने, रोख दोन लाख रुपये घेऊन दुकानात जात होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या नासुप्रच्या बगीच्यात क्रिकेट खेळण्याचा बनाव करीत असलेल्या दोन लुटारूंनी त्याला अडविले. त्यापैकी एकाने बंडू यांच्या डोळ्यांत तिखट फेकले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोक्‍यावर बॅटने वार केला. त्यामुळे ते खाली पडले. लुटारू त्यांची दुचाकी घेऊन मेहंदी बाग रोडवरून पळून गेले. डोक्‍याला बॅट लागल्यामुळे रक्‍तबंबाळ झालेल्या बंडू यांनी मोबाईलवरून १०० नंबरवर फोन केला. काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहोचले.  त्यांनी जखमी बंडू यांना उपचारासाठी मेयोत पाठवले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हे दाखल केले. घटनास्थळाला अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त श्‍यामराव दिघावकर, डीसीपी राहुल माकणीकर, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी भेट दिली.

टिपवरून लुटमार
सराफा व्यापारी बंडू कुंभरे हे दुपारी जेवण करून दुचाकीच्या डिकीत सोन्याचे दागिने ठेवून दुकानात जात होते. दरम्यान, त्यांची वाट पाहत मैदानावर क्रिकेट खेळण्याचा बनाव करीत असलेले दोन लुटारू समोर आले. दुचाकीच्या डिकीत सोने आणि रोख रक्‍कम असल्याची टिप मिळाल्यानंतरच नियोजनबद्ध लूटमार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे कुणीतरी ओळखीच्या व्यक्‍तीवर पोलिसांनी संशय व्यक्‍त केला आहे.

शहरभरात नाकाबंदी 
वैशालीनगरात सराफा व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांनी शहरभर नाकाबंदी केली. युवकांच्या वर्णनावरून आणि दुचाकीचा क्रमांक सांगून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. वॉकीटॉकीवरून शहरभरातील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपींबाबत सुगावा लागू शकला नाही. 

सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात 
लुटारूंनी लूटमार केल्याची घटना शेजारी असलेल्या दुकानाच्या कॅमेऱ्यात कैदी झाली. तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. यासोबतच मेहंदी बाग रोडवर असलेले काही सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी मिळवले. यामध्ये दोन युवक दुचाकी घेऊन पळताना दिसत आहेत. त्यांची ओळख अद्याप पटली नाही.

Web Title: nagpur news crime robbery