मोलकरणींच्या आयुष्यात दाटला काळोख

मोलकरणींच्या आयुष्यात दाटला काळोख

नागपूर - ‘राहू द्या नं भाऊ... आमची गत काय विचारता... मोलकरणी आम्ही. आमच्यासारखं वाईट आयुष्य कोणाचंही नाही... आम्ही साऱ्या मोलकरणी अभागिनी... बरं असो वा नसो... घरोघरी जाऊन काम नाही केलं तर लेकरं पोसायची कशी... दयनीय अवस्था आहे आमची, जाऊ द्या... दिव्याखाली अंधार असते, हे साऱ्यानांच ठाऊक आहे. कसंतरी वयस्कांना सन्मानधन मिळतं होतं, मरणाचा खर्चही मिळतं होता... तेही बंद झालं. या भावना आहेत, स्वतःच्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांच्या. 

घरकामगार महिलांचे जगणे सुकर व्हावे या हेतूने तत्कालीन सरकारने २०११ मध्ये सुरू केलेली घरकामगार नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली. घरकामगारांसाठी स्थापन केलेले महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार मंडळ २०१४ पासून थंडबस्त्यात आहे. घरेलू कामगारांसाठी असलेली जनश्री आणि सन्मानधन योजनाही बंद पडली असल्याने घरकामगार महिलांना ना कामाची शाश्‍वती, ना भविष्याची सोय, त्यांच्या आयुष्यात आता मात्र काळोख दाटला आहे. 

तत्कालीन काँग्रेस सरकारने घरकामगार महिलांसाठी घरेलू कामगार मंडळ तयार केले होते. राज्यभरात कामगार आयुक्‍तालयात घरकामगार महिलांची नोंदणी सुरू केली. तीन वर्षे नोंदणी सुरू होती. नागपुरात विदर्भ मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून ३० हजारांवर महिलांची नोंदणी झाली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये मंडळ बरखास्त केले. त्याबरोबर साऱ्या योजनांचा अकाली मृत्यू झाला. वयस्क घरकामगार महिलांना सन्मानधन म्हणून १० हजार दिले जात होते. तसेच ‘जनश्री’ योजनेद्वारे विम्याचे संरक्षणही दिले जात होते. आता शासनाकडून या महिलांना शासनाचे कोणतेही कवच नाही.

कमावलेले पोटालेच पुरत नाही
चंदा अंभोरे हिचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. पायाला चाकं लावल्यागत ती धावत असते. या घरातील कामं आटोपली की, दुसऱ्या घरी. अशी पाच घरची धुणीभांडी अन्‌ स्वयंपाक करते. यानंतर दुपारी घरी येते. चिमुकल्यांना चार घास खाऊ घालते. पुन्हा सायंकाळी तीन घरातील कामे करण्यासाठी निघून जाते. सरकारी लाभ नाही, घरमालकांकडून मिळेल त्या पैशात काम करावे लागतं. पोटाचं पोटालेच पुरत नाही, तर लेकरायले शिकवायचं कसं? हा चंदाचा सवाल. बरं वाईट झालं तर कुटुंबाचं कसं होईल, या विचारात ती आयुष्याचा गाढा कसाबसा ओढत आहे.

राज्यात १ लाख ३० हजार घरकामगारांची नोंदणी घरेलू कामगार कल्याण मंडळाने केली. जनश्री विमा योजना, अंत्यविधी सहाय्य, विदेशी भाषा प्रशिक्षण, अपघातात लाभार्थींना तत्काळ सहाय्य पुरविण्यापासून मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, वैद्यकीय खर्चाची तरतूद, मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्च अशा सर्व सुविधांचा लाभ सुरू झाला होता. सन्मानधनापासून तर अंत्यविधीची रक्कम नागपुरातील महिलांना मिळाली. परंतु, विद्यमान सरकारने मंडळ बरखास्त केले. यामुळे घरकामगार महिलांचे जगणेच मुश्‍कील झाले आहे.   
- डॉ. रूपा कुलकर्णी-बोधी

नागपुरात साधारणतः लाख घरकामगार आहेत. त्यापैकी २५ टक्के महिला ज्येष्ठ नागरिक म्हणजेच सन्मानधन योजनेसाठी पात्र होत्या. आता त्यांच्याकडून घरकाम होत नाही. परंतु, योजनाच बंद पडल्याने त्यांच्यासमोर भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घरकामगार महिलांना वाऱ्यावर सोडले आहे. 
- विलास भोंगाडे, कष्टकरी समाजाचे नेते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com