दीक्षाभूमीला भेट देऊन स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

दीक्षाभूमीला भेट देऊन स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

नागपूर - नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी प्रा. अरुण साधू यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. उद्‌घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांच्या भेटीगाठींमध्ये रमण्याआधी प्रा. साधू यांचे दीक्षाभूमीला भेट देणे, हे त्यांच्या बांधीलकीचेच प्रतीक होते, अशी भावना साहित्य वर्तुळातून त्यावेळी आणि आजही व्यक्त होत आहे.

नागपुरात २००६ मध्ये झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रा. अरुण साधू संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाध्यक्ष प्रा. अरुण साधू, पूर्वाध्यक्ष मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक नामवर सिंह आणि भाई बर्धन अशी वैचारिक भट्टी उद्‌घाटन सोहळ्यात जमली होती. 

प्रत्येकाची भाषणे नागपूरकर साहित्यिक व अभ्यासकांच्या कायम स्मरणात राहावी, अशीच आहेत. विशेष म्हणजे अरुण साधू यांनी अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा व संस्कृतीसंदर्भातील प्रश्‍नांची चिकित्सा करणारे मांडलेले मुद्दे अगदी आज दहा वर्षांनंतरही विविध चिंतनांमधून चर्चेला येतात. १८५७ मध्ये बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. मराठीतील ही आद्य कादंबरी मानली जाते. या कादंबरीचे यंदा शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६०) वर्ष आहे. मराठी कादंबरीच्या समृद्ध परंपरेतील एक महत्त्वाचे नाव असलेले अरुण साधू यांची या औचित्यावरील एक्‍झिट एक वेगळा योगायोग ठरतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाराष्ट्र सरकारतर्फे दिले जाणारे वाङ्‌मय पुरस्कार आणीबाणीच्या काळात परीक्षकांच्या निवडीनुसार अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ व विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या कादंबऱ्यांना देण्यात येणार होता. परंतु, या दोन्ही कादंबऱ्या तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर कठोर भाष्य करणाऱ्या असल्याने त्यांना पुरस्कार टाळण्यात आल्याचे प्रकरणही त्या काळात गाजले होते. 

सूत्रे न सोपविताच निघून गेले...
नागपूरच्या संमेलनानंतर ८१ वे संमेलन सांगलीला ठरले. प्रा. साधू नवनिर्वाचित अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांना सूत्रे सोपविणार होते. या संमेलनाच्या उद्‌घाटनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. महामंडळाने राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार पूर्वाध्यक्षांच्या भाषणासाठी वेळच ठेवला नाही आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांना केवळ दहा मिनिटे ठेवण्यात आली. संमेलनाच्या व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या तुलनेत अध्यक्षांना महत्त्व दिले जात नव्हते, याची खंत त्यांना वाटली. त्यामुळे हातकणंगलेकर यांना सूत्रे न सोपविता उद्‌घाटनाच्या आदल्या दिवशीच ते मुंबईला परतले होते. प्रा. अरुण साधू यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेचे समस्त साहित्य वर्तुळाने स्वागत केले होते.

नागपुरात झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अरुण साधू यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतोय. त्यांच्याशी माझे फार पूर्वीपासून स्नेहाचे संबंध होते. कादबंरीच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे असे हे नाव होते. त्यांच्या निधनामुळे पोकळी राहील, पण त्यांचे लिखाण पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारे ठरेल.
- मनोहर म्हैसाळकर

अरुण साधू माझे जुने स्नेही आणि समविचारी होते. महत्त्वाचे लेखक, पत्रकार होते. नागपूरला २००६ मध्ये झालेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भूमिका घेणारे व त्यावर ठाम राहणारे होते. समताधिष्ठित समाजासाठीचा लोकानुवर्ती विचार हा त्यांच्या लेखनाचा व पत्रकारितेचाही मूलाधार होता. मराठीत वेगळ्या शैलीची, वेगळ्या विषयांची, आशयाची समृद्ध भर त्यांनी घातली. राजकीय कादंबरी त्यांनीच प्रतिष्ठित व समृद्ध केली.
- डॉ. श्रीपाद भा. जोशी

अरुण साधू हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार, तसेच महत्त्वाचे राजकीय, सामाजिक कादंबरीकार होते. नव्या युगात प्रवेश करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात होते. पत्रकार म्हणून असणाऱ्या सामाजिक व राजकीय जीवनाचा अनुभव कलारूप पातळीवर करणारा असा हा कादंबरीकार होता. मराठीतील एका दर्जेदार कादंबरीकाराला आपण मुकलो आहोत.
- डॉ. अक्षयकुमार काळे

अरुण साधू हे आमच्या पिढीतीले महत्त्वाचे कथा, कादंबरीकार होते. त्यांची पत्रकारिता वेगळ्या प्रकारची होती. विदर्भातल्या अचलपूरचे असल्यामुळे ते आमच्या अधिक हृदयाजवळचे होते. ग्रंथाली चळवळीचे ते आधारस्तंभ होते. नागपुरात झालेल्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण चाकोरीबाहेरचे आणि विज्ञानाच्या अंगाने जाणारे होते.
- प्रा. वसंत आबाजी डहाके

अरुण साधू हे मराठीतील वेगळ्या प्रकृतीचे कादंबरीकार होते. त्यांनी केलेले काम अद्वितीय. राजकीय कादंबरी अधिक ठळक करण्याचा मान अरुण साधू यांना. ते बांधीलकी मानणारे कादंबरीकार होते. अनेक कादंबऱ्यांमधून संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन होते. वेगळी जीवनदृष्टी देणारा आणि लेखनाच्या कुठल्याही मर्यादा न मानणारे कादंबरीकार. मराठी कादंबरीचे विश्‍व अधिक समृद्ध केले. एक अर्बन कल्चरसुद्धा कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न. त्यांच्या खांद्यावर बसून आमची पिढी प्रवास करीत आहे..
- डॉ. रवींद्र शोभणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com