शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे रणशिंग नागपुरातून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - यंदा पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात असून शासनाचे धोरणही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारविरोधात आता शेतकरी नेत्यांनी वज्रमूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातूनच सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे वेगवेगळ्या घडामोडीतून स्पष्ट झाले.  

नागपूर - यंदा पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात असून शासनाचे धोरणही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारविरोधात आता शेतकरी नेत्यांनी वज्रमूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातूनच सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे वेगवेगळ्या घडामोडीतून स्पष्ट झाले.  

संपूर्ण विदर्भातील शेतकरी पावसामुळे हवालदिल झाला आहे. त्यातच राज्य व केंद्राकडूनही शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाही. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनी नागपुरातूनच सरकारविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी रणनीती तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ एक अनेक आंदोलन नागपुरात होणार असून रणनीतीचा एक भाग असल्याचे समजते. शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भंडारा व नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादकांसाठी २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील निमखेडा येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले. धान उत्पादकांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीकविम्यामुळे केवळ विमा कंपन्यांचे भले झाल्याचा आरोप करीत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर तोंडसुख घेतले. देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील निमखेड्यात पाणी परिषद आयोजित केली.

खासदार शेट्टी यांनी शनिवारी शहरातील वैधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या जनमंचच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. विदर्भातील आमदार बच्चू कडू यांनीही आज शहरातील जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांची भेट घेतली. प्रहार संघटनेचा शहरात विस्तार करण्यात येत असून आमदार कडू यांनी महाल येथे एका शाखेचे उद्‌घाटनही आज केले. जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांची भेट घेऊन आमदार कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची योजना आखली. उद्या सोमवारी शहरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी दुजोरा दिला. यात शहरातील शेतकरी नेते एकत्र येणार आहे. एकूणच शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची धार नागपुरातूनच अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

शहरातील दोन संघटना देणार बळ 
प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी आज शहरातील जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. काल, शनिवारी खासदार राजू शेट्टी यांनी जनमंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जय जवान, जय किसान ही संघटना आक्रमक आंदोलनासाठी तर जनमंच कायदेशीररीत्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता रस्त्यांवर तसेच वैधानिक पद्धतीनेही शहरातून आंदोलन पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: nagpur news farmer agitation start in nagpur