वीज टॉवरसाठी शेतकऱ्यांना दोनशेपट मोबदला - वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

नागपूर - शेतजमिनीवर उभारण्यात येणाऱ्या वीज टॉवरसाठी मालकास दोनशेपट मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जामंत्र्यांनी घेतल्याची माहिती कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही वीज कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार शेतजमिनीवर वीज टॉवर उभारतात. यामुळे 60 मीटपरपेक्षा अधिकची जमीन जाते. सततच्या उच्च दाबाच्या वीज प्रवाहामुळे त्याखालील जमिनीचा वापर होत नाही. यासाठी शेतकऱ्यांना फारच थोडा मोबदला देण्यात येतो. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा मुद्दा मी आणि बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे लावून धरला होता. गुरुवारी ऊर्जामंत्र्यांनी यासंदर्भात बैठक लावली. यात वीज कंपनीचे अधिकारी होते. टॉवरमुळे पडीक होत असलेल्या जागेसाठी अकृषक जमिनीनुसार दोनशेपट मोबदला देण्याची मागणी केली. ऊर्जामंत्र्यांनी ती मान्य केली. भूमापन अधिकाऱ्यामार्फत जमिनीचे मोजमाप करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे जमा केल्याशिवाय जमीन घेऊ नये, असे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
Web Title: nagpur news farmer double allowance for electricity tower