सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

सावनेर - शेतीसाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अवघड झाल्याने तसेच सावकाराच्या तगाद्याला कंटाळून ओमप्रकाश रमेश गोल्लरवार (२५, रा. टेंबुरडोह, ता. सावनेर) या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. सावकाराच्या जाचाला आणखी एक शेतकरी बळी पडल्याने सरकाराच्या धोरणाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

ओमप्रकाशचे कुटुंब भूमिहीन आहे. चार वर्षांपासून सोमाजी जिगरोल यांची ओमप्रकाश व मोठा भाऊ ठेक्‍याने शेती करीत होते. भूमिहीन असल्याने बॅंकेतून कर्ज मिळत नसल्यामुळे त्यांनी सोने सावकाराकडे गहाण ठेवले. त्यातून आलेल्या पैशातून बियाणे व खते घेतली.  मात्र, सततच्या नापिकीमुळे हातात पैसा उरत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. शेतीसाठी खर्च लागत असल्याने अनेकदा दोन्ही भावंडांनी उसनवारीवर पैसे घेतले. सावकार व उसनवारी देणाऱ्यांचा तगादा वाढल्याने काही दिवसांपासून ओमप्रकाश नैराश्‍यात होता. याचमुळे त्याने गावात जाणे टाळले होते, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारस ओमप्रकाशचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. खापा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. खाप्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक मानवटकर प्रकरणाचा तपास करीत आहे.

अवैध सावकारी करणारा कोण?
ओमप्रकाशने गावातीलच सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. काही काळापासून त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. मात्र, हा सावकार कोण याची  माहिती मिळाली नाही. अवैधरीत्या सावकारी करणे गुन्हा आहे. बंदी असताना सावकारी करणाऱ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर आल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: nagpur news farmer suicide