गृहिणी-मोलकरणींमध्ये ‘ती’ जोडतेय मैत्रीचे नाते 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

विश्‍वास या एका शब्दावर गृहिणी आणि मोलकरणींचे नाते अवलंबून आहे. आम्ही हा विश्‍वास मैत्रीच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात यशही मिळतेय.
- ऊर्मी चक्रवर्ती मित्रा, संस्थापक, नागपूर सर्कल ऑफ मॉम

नागपूर - गृहिणी आणि मोलकरणींमध्ये दररोज वाद झाले तरी त्यांच्यात एक अनोखे नाते असते. पण, त्याची जाणीव एखाद्याच प्रसंगाला होत असते. ऊर्मी चक्रवर्ती मित्रा यांनी मात्र मालक आणि नोकर अशा संबंधामध्ये मोडणारे हे नाते मैत्रीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने त्या दोघींनाही एका व्यासपीठावर आणत आहेत.

घरकाम करणाऱ्या महिलांवर मुळीच विश्‍वास नसणारे आणि खूप विश्‍वास ठेवणारे अशी दोन प्रकारची कुटुंबे असतात. पण, यात विश्‍वास न ठेवता केवळ कामापुरता संबंध ठेवणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. गंमत म्हणजे विश्‍वास नसला तरी अडीअडचणीला प्रत्येक गृहिणीला कुठल्याही नातेवाइकाच्या आधी मोलकरणीचीच आठवण येत असते. प्रकृती खराब असेल, घरी खूप पाहुणे आले असतील, घरी जास्तीची कामे काढली असतील किंवा नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असतील, तर त्या ठिकाणी मोलकरणीचे ‘मोल’ कमालीचे असते. पण, तरी त्या नात्याला मैत्रीचा गंध नसतो. ते निर्माण करण्यासाठी ऊर्मी यांनी दहा वर्षांपूर्वी ‘नागपूर सर्कल ऑफ मॉम’ या संस्थेची स्थापना केली. यामध्ये गृहिणी आणि मोलकरणींना एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. गृहिणींसाठी विरंगुळा आणि मोलकरणींसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे एक साधन यातून तयार होतेय. सणांच्या दिवसांमध्ये गणपती तयार करणे, पूजेचे साहित्य तयार करणे आदींचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. वर्षभरात वेगवेगळ्या निमित्तांनी या कार्यशाळा घेण्यात येतात. २९१ महिला या व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत. गृहिणी आणि मोलकरणी एकत्रितपणे आणि एकमेकांच्या मदतीने एखादे काम करताना या ठिकाणी बघायला मिळते. विशेष म्हणजे नागपूरच्या जवळपास सर्वच भागांमधील मोलकरणी आणि गृहिणी या संस्थेशी जुळलेल्या आहेत. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या अनोख्या समाजकार्याने अनेक गृहिणी आणि मोलकरणींमध्ये मैत्रीचे अतूट नाते तयार झाले. एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. मोनिका भार्गव, सुचिता काटकर आणि सुरभी नय्यर यांचे ऊर्मी यांना विशेष सहकार्य लाभत असते.

Web Title: nagpur news friendship