निवासस्थान सोडण्यापूर्वी वीजबिलाचा दाखला द्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - शासकीय निवासस्थानी राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने 22 मे रोजी परिपत्रक काढले आहे. 

अधिकारी किंवा कर्मचारी क्वॉर्टर सोडताना वीजबिल भरत नाहीत किंवा प्रलंबित ठेवत असल्याचे आढळून येते. नंतर राहायला येणाऱ्यांना प्रलंबित वीजबिलामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. उदय योजनेबाबत तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर खल झाले. याच बैठकीत शासकीय निवासस्थान सोडताना महावितरणकडून विजेची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना घेणे बंधनकारक करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. 

पूर्वी वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्याने वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय निवासस्थानाचा ताबा घेण्याबाबतची कार्यवाही करू नये, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

उपविभागीय कार्यालयात करता येणार अर्ज 
वीजबिल थकीत नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी यांनी रीडिंगनुसार तात्पुरते (प्रोव्हिजनल) वीजबिल देऊन त्या वीजबिलाचा भरणा केल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, असे राज्य शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: nagpur news Give electricity bills before leaving home