'राजकारणातील व्‍यक्‍तिपूजा म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल'

'राजकारणातील व्‍यक्‍तिपूजा म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल'

नागपूर - राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजेला झुकते माप दिल्यास देशाची अधःपतनाकडे वाटचाल सुरू होऊन हमखास हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग ठरेल, असा इशारा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता, असे मत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज नागपुरात व्यक्त केले. 

दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या ‘महाराष्ट्रातील गरिबी व असमानता आणि अस्पृश्‍यता’ व ‘सामाजिक भेदभाव व अत्याचार’ अहवालाचे अन्सारी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, औद्योगिक विकासचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते. 

हमीद अन्सारी म्हणाले, लोकशाही रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यांचे आता विस्मरण झाले आहे. सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी घटनाबाह्य पद्धतीचा त्याग करणे आवश्‍यक आहे. डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे संदर्भ देत आजच्या वास्तव निकषावरही अन्सारी यांनी बोट ठेवले. जोपर्यंत सरकार धोरणात आणि व्यवहारात निधर्मी राहात नाही, तोपर्यंत घटनेत असलेल्या मधील सामाजिक आर्थिक समानता साध्य होत नाही. सरकार निधर्मीपणे कार्यरत राहण्यास अपयशी ठरले तर घटनेची सामाजिक आर्थिक समानतेचे उद्दिष्ट साध्य होत नाही. महाराष्ट्रात १९९३ मध्ये ४९ टक्के असलेले दारिद्य्र २०१२ मध्ये १७ टक्‍के कमी झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण ६५ टक्‍क्‍यावरून ८२ टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. वीज, पाणी आणि स्वच्छतेमध्ये विकास होत आहे. परंतु, हा विकास विषम स्वरूपात दिसत असल्याची आकडेवारी त्यांनी यावेळी सादर केली. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र दुसरा असला तरी गरिबीत राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. कुपोषणात राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले. विषम मानवी विकासचे मापदंड सांगताना व्यक्ती आणि आंतरसमूह विचारात घेतले जात असल्याचे अन्सारी म्हणाले. दलित आणि मुस्लिम यांच्याच्या विकासात विषमता दिसत असल्याने सामाजिक न्याय आणि सामाजिक शांततेची गरज असल्याचे हमीद अन्सारी यांनी आज येथे नमूद केले. प्रास्ताविक प्रा. विजय खरे यांनी केले. संचालन डॉ. गौतम कांबळे यांनी केले. मुंबईचे डॉ. पी. जी. जोगदंड यांनी करून दिला. आभार डॉ. गौतम गवळी यांनी मांनले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com