उपराजधानीतून अमितचे हृदय झेपावले दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - केवळ भोवळ येऊन खाली पडल्याने ४१ वर्षीय अमित अवस्थी यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. ते ‘ब्रेन डेड’ झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु, हे दुःख पचवून कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अवघ्या काही तासांत त्यांचे हृदय दिल्लीत प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. उपराजधानीतील हृदय देशाच्या राजधानीत प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची ही पहिलीच वेळ. यकृताचे प्रत्यारोपण पुण्यात झाले, तर बुब्बुळ आणि त्वचा नागपुरात दान करण्यात आली.

तरुण मुलगा अमित सोडून गेल्याचे दुःख पचविण्याची वेळ वनविभागातून सेवानिवृत्त वडील विनोदकुमार अवस्थी आणि आई रत्नावली यांच्या नशिबी आली. २४ ऑक्‍टोबरला अमित  भोवळ आल्याने पडला. मेंदूत रक्तस्त्राव झाला. न्युरॉन हॉस्पिटलमध्ये भरती केले. मेंदूतील रक्तस्त्रांवामुळे उपचाराला दाद मिळाली नाही. अखेर २९ ऑक्‍टोबला मेंदूमृत्यू झाल्याची सूचना दिली. कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवले.  राष्ट्रीय अवयवदान समितीशी वोक्‍हार्ट हॉस्पिटल प्रशासनाने संपर्क साधला. अमितच्या गुणसूत्रांशी जुळणारा हृदयाच्या प्रतीक्षेतील रुग्ण दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये आढळला. हृदय पाठविण्यासंदर्भात नातेवाइकांच्या संमतीने निर्णय घेण्यात आला. तर, पुण्यात यकृताच्या प्रतीक्षेत रुग्ण असल्याचे आढळले. यकृत पुण्याच्या सह्याद्रीत पाठवले. दोघांना जीवनदान देण्याचं पुण्यकर्म अमितच्या मृत्यूनंतर झालं. ही समाधानकारक बाब असली तरी तरुण मुलगा आयुष्याच्या उत्तरार्धात सोडून गेल्याचे दुःख अमितच्या आईवडिलांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं. गुंतागुंत झाल्यामुळे  किडनीचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. मात्र, अमित यांचे दोन्ही डोळे माधव नेत्रपेढीला देण्यात आले असून, त्वचाही दान करण्यात आली आहे. या अवयवदानातून मृत्यूच्या दाढेतील दोन जणांना जीवदान मिळाले आहे. या अवयवदान प्रक्रियेत विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्यासह डॉ. संजय पाखमोडे, डॉ. प्रमोद गिरी,  डॉ. समीर पाठक, डॉ. मिलिंद होटे, डॉ. अवंतिका जयस्वाल, डॉ. अनुराग श्रीमल, डॉ. राजेश गाडे यांनी परिश्रम घेतले.

तीन मिनिटांत हृदय विमानतळावर
अवयवदानाच्या प्रक्रियेनंतर सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांनी शंकरनगरातील वोक्‍हार्ट हॉस्पिटलमधून पोलिस व्हॅन सायरन वाजवत निघाली. ॲम्बुलन्सने ‘ग्रीन कॉरिडॉर’मधून अवघ्या ३ मिनिटे २० सेकंदांत अमित अवस्थीचे हृदय आणि यकृत विमानतळापर्यंत पोहोचले. यापूर्वी ३ मिनिट ५८ सेंकदात विमानतळावर पोहोचल्याची नोंद होती. यावेळी ३ मिनिटे २० सेकंदात पोहोचवल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली. विशेष असे की, एका विमानातून ‘हृदय’ दिल्लीकडे तर यकृत पुण्याला  दुसऱ्या विमानाने झेपावले.

Web Title: nagpur news heart