गंगा शुद्धीकरण प्रकल्पात हातभार लावावा - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नागपूर - केंद्र सरकार गंगा शुद्धीकरणासाठी कटिबद्ध असून ग्रामविकास, सौंदर्यीकरणासाठी कंपन्या व सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

नागपूर - केंद्र सरकार गंगा शुद्धीकरणासाठी कटिबद्ध असून ग्रामविकास, सौंदर्यीकरणासाठी कंपन्या व सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

सुराबर्डी मिडोज परिसरात रोटरी क्‍लब जिल्हा ३०३० ची वार्षिक परिषद ‘प्रतिबिंब’च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. कृष्णमूर्ती सुंदरराजन, त्यांच्या पत्नी डॉ. भाग्यलक्ष्मी, रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल बांगला देशातून आलेले डॉ. ॲनिसुज्जमान, त्यांच्या पत्नी शेरिंग, रोटरीचे माजी अध्यक्ष अविनाश बेंद्रे, राघवेंद्र जैन, महेश मोखा, आयोजन सचिव पंकज महाजन उपस्थित होते. गडकरी म्हणाले, निर्मल गंगा शुद्धीकरण प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गंगा नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात आहेत. साडेचार हजार गंगा ग्रामविकास प्रकल्प आहेत. त्यात स्वच्छता, कौशल्य विकास प्रशिक्षण, शिक्षण प्रकल्प आहेत. गंगेच्या काठावर घाट, धर्मशाळा, सौंदर्यीकरण प्रकल्प आहेत. विविध उद्योजक, कंपन्या पुढे येत आहेत.

यासाठी आणि स्वच्छता, शिक्षण वगैरे जनजागरणासाठी गंगा सेवक म्हणून संस्था, संघटनांनी, व्यक्तिशः सहभागी व्हावे, असे आवाहन गडकरींनी केले. 
गडकरींच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. के. एस. राजन यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, गडकरी यांनी वेदप्रकाश पांडे, बी. के. अग्रवाल, अस्पी बापूना यांचा सत्कार केला. नितीन गडकरींचा परिचय क्षेत्रीय प्रांतपाल धनंजय बापट यांनी करून दिला. संचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले. आभार पंकज महाजन यांनी मानले. 

प्रारंभी रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. के. एस. राजन यांच्या हस्ते झाले. त्यानंतर डॉ. कृष्णमूर्ती सुंदरराजन, त्यांच्या पत्नी डॉ. भाग्यलक्ष्मी, रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल बांगला देशचे डॉ. ॲनिसुज्जमान त्यांच्या पत्नी शेरिंग यांना मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.

Web Title: nagpur news Help in Ganga Purification Project