मेडिकल-मेयोत ३६ तासांचाच ‘ऑक्‍सिजन’

मेडिकल-मेयोत ३६ तासांचाच ‘ऑक्‍सिजन’

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर उपराजधानीतील मेयो आणि मेडिकलमध्ये उपचारासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन रोजची गरज रोज भागविली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. अवघे ३६ तास पुरेल एवढाच ऑक्‍सिजन सिलिंडरचा साठा असतो. त्यामुळे विदर्भातील रुग्णांसाठी ही धोक्‍याची घंटा ठरू शकते. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दरदिवशी १७५ ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज आहे. त्यासाठी कळमना येथील कंपनीकडून दर दिवसाला हा पुरवठा होतो. बाह्यरुग्ण विभागात मेडिकलमध्ये दोन ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात, तर एक हजार  रुग्ण भरती असतात. भरती रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्णांना ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासते. याशिवाय सात शस्त्रक्रियागार, ट्रॉमा युनिट, अतिदक्षता विभाग येथे गंभीरावस्थेतील उपचारासाठी भरती असतात. याशिवाय एकूण ४९ वॉर्ड सध्या सुरू आहेत. खाटा अतिदक्षता विभागात  उपलब्ध असाव्यात, असा नियम आहे. प्रत्यक्षात मेडिकलच्या अतिदक्षता विभागात वॉर्ड क्रमांक २४ मध्ये केवळ २५ खाटा आहेत. तर २० खाटा अपघात विभागात आयसीयूसाठी राखीव आहेत. त्यात नव्याने सुरू झालेल्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये सध्या अद्ययावत ऑक्‍सिजन पुरवठ्याची सुविधा असलेल्या ३० खाटा सेवेत आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला रोज किमान १७५ ते १८० ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासते. त्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अशा  दोन शिफ्टमध्ये सिलिंडरचा पुरवठा केला जातो. केंद्रीय प्रणालीद्वारे ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू आहे. परंतु, अचानक तांत्रिक अडचणीमुळे किंवा आकस्मिक घटनेमुळे ऑक्‍सिजन सिलिंडर मेडिकलमध्ये पोहोचू शकले नाही, तर केवळ दीड दिवस ऑक्‍सिजन मेडिकलमध्ये उपलब्ध असेल. पाच ते दहा दिवस पुरेल एवढा ऑक्‍सिजनचा साठा करून ठेवण्याची सोय मेडिकल आणि मेयोमध्येही नाही. 

मेयोतील ऑक्‍सिजन प्लांट थंडबस्त्यात  
मेडिकलसारखी स्थिती इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आहे. येथे अतिदक्षता विभागासह बालकांसाठी ५६ खाटा आहेत. मेयोला रोज ४५ जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर पुरवठा केला जातो. आदित्य एजन्सीजमार्फत पुरवठा होतो. येथेही दीड दिवस पुरेल इतकाच साठा असतो. येथील नवीन अडीचशे खाटांच्या रुग्णालयात तयार करण्यात आलेला लिक्विड ऑक्‍सिजन प्लांट थंडबस्त्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com