पती-पत्नी, वहिनीने गाठले यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - प्रतिकूल परिस्थितीने शिक्षणाची वाट अडविली. काळानेच शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याची जाणीव करून दिली. गरज ओळखून पती-पत्नीने शिक्षण पूर्ण करण्याचा  ध्यास घेतला. अल्पशिक्षित वहिनीनेसुद्धा या निर्णयाला बळ देत त्यांच्याच सोबतीने अभ्यास करण्याचा निर्धार केला. तिघांनीही बारावीच्या परीक्षेत एकत्रितच यश संपादित केले. हे चित्रपटाचे कथानक नाही, तर उपराजधानीतील गजभिये कुटुंबीयांनी साकारलेले वास्तव आहे.

नारी मार्गावारील दीपकनगरात गजभिये कुटुंब वास्तव्यास आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे विनोद गजभिये (४२) यांना शिक्षण थांबवून रोजगाराची कास धरावी लागली. पत्नी सुनीता गजभिये (३६) व वहिनी स्वर्णा गजभिये (३४) यांनासुद्धा अपेक्षेनुसार शिक्षण पूर्ण करता आले नाही. शिक्षण कमी असल्याने त्यांच्यापुढे सातत्याने अडचणी येत होत्या. मुलांनाही अभ्यासात सहकार्य करू शकत नसल्याची रुखरूख मनात होती.

दोन वर्षांपूर्वी सुनीता व विनोद यांनी दहावीची परीक्षा देण्याचे ठरविले. वहिनी स्वर्णा यांनीही त्यांच्या सोबतीने अर्ज केला. दहावीत मिळालेल्या यशाने त्यांना पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळाली. कामाच्या व्यापामुळे दिवसा शिकणे शक्‍य नसल्याने त्यांनी बर्डीतील जवाहर नाईट ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. विनोद व सुनीता यांचा मुलगा सत्वम मॉडर्न स्कूलचा विद्यार्थी असून, दहावीची परीक्षा तोंडावर असतानाही तो पालकांना इंग्रजी विषयाशी संबंधित मार्गदर्शन करीत होता.

मुलाकडून शिकण्याचे न्यून न बाळगता त्यावर अभिमान व्यक्त करीत होते. कुटुंबाच्या या परिश्रमावर आजच्या निकालाने यशाची मोहर उमटली. सुनीता यांनी ६७ टक्के, विनोद यांनी ४९ टक्के, तर स्वर्णा यांनी ५६ टक्के गुण पटकावले. परिश्रम आणि शिक्षकांमुळेच हे शक्‍य होऊ शकल्याची प्रतिक्रिया तिघांनीही नोंदविली. जवाहर नाईट कॉलेजच्या ६६ टक्के विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीत यश संपादित केले असून, शहरातील सायंकालीन महाविद्यालयांमधून कॉलेजने टॉप  केले आहे.

शिक्षणासाठी नोकरीवर पाणी
सुनीता आणि स्वर्णा या गृहिणी असून, विनोद खासगी नोकरी करून संसाराचा गाडा ओढतात. जीवनात यशासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याची जाणीव झाली. परंतु, ऐन परीक्षाकाळातच नोकरीमुळे अभ्यासात व्यत्यय येत होता. यामुळे विनोद यांनी परीक्षेला महत्त्व देत नोकरीवर पाणी सोडले. आज मिळेल ते काम करून ते संसाराला हातभार लावत आहेत. प्रत्येकाने किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे मत विनोद यांनी व्यक्त केले.

Web Title: nagpur news hsc result family