सघन सिंचनाचा ११०० कोटींचा प्रस्ताव पाठवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - विदर्भात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करणे व कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने शासनाने विदर्भ सघन सिंचन कार्यक्रम राबविण्यासाठी अकराशे कोटींचा प्रस्ताव तीन आठवड्यांत केंद्र शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिले.

नागपूर - विदर्भात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करणे व कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने शासनाने विदर्भ सघन सिंचन कार्यक्रम राबविण्यासाठी अकराशे कोटींचा प्रस्ताव तीन आठवड्यांत केंद्र शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिले.

सिंचन भवनमध्ये जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. विदर्भ सघन सिंचनासाठी १,४०० कोटी रुपये मंजूर होते. यापैकी ३०० कोटीच खर्च होऊ शकले. यामुळे उर्वरित रकमेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. विदर्भ सघन सिंचनाचे हे प्रस्ताव केंद्रीय जलसंधारण खात्याकडे सादर झाल्यानंतर निधी उपलब्ध होईल व विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच राज्य शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही राष्ट्रीय योजना व्हावी यासाठी कृषी, जलसंधारण आणि ऊर्जा या तिन्ही विभागांनी राष्ट्रीय  योजनेसाठी प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे सादर करावेत. 

ही योजना राष्ट्रीय योजना व्हावी अशी विनंती आपण केंद्र शासनाला करणार आहोत, असेही पालकमंत्री म्हणाले. पेंच प्रकल्पाच्या कमांड भागात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना राबविणे. ५० हजारांपेक्षा जास्त सूक्ष्म सिंचन योजनांसाठी १,७०० कोटींचे प्रस्ताव तयार करणे. त्यात ७५ हजार विहिरी व त्या विहिरींनी विजेचे कनेक्‍शन, ६ उपसा जलसिंचन योजनांसाठी दोन भागात प्रस्ताव तयार करणे  व ते शासनाला सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्हा परिषदेकडील मौदा, कामठी आणि पारशिवनी तालुक्‍यातील जलसंधारणाची १३७ कामे स्थानिक विभागाकडे वळती करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. 

पाण्यासाठी शक्‍य असेल ते करा 
एनटीपीसीला वीज प्रकल्पासाठी भांडेवाडीतूनच मनपाचे पाणी घ्यावे लागेल. मनपाचे सांडपाणी शुद्ध करून हे पाणी घ्यावे लागेल. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्र सांडपाण्यावरच सध्या सुरू आहे. त्या पद्धतीचे मॉडेल एनटीपीसीने स्वीकारावे किंवा मनपाकडून शुद्ध पाणी घेऊन मनपाशी त्याचा दरकरार करावा. यापैकी एनटीपीसीला शंक्‍य असेल ते करावे. एनटीपीसीकडे पाणी नेण्यासाठी पुरेसा उतार असल्यामुळे पाणी नैसर्गिकरीत्या नेणे शक्‍य होईल. खापरखेडा १०० एमएलडी, कोराडी ५० एमएलडी आणि एनटीपीसीला १०० एमएलडी पाणी मिळू शकते,  याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष वेधले.

Web Title: nagpur news irrigation