गडकरींच्या सल्ल्याने केजरीवाल येणार नागपुरात

राजेश प्रायकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - कधीकाळी एकमेकांवर चिखलफेक करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांच्यात दिल्लीतील यमुना नदी स्वच्छतेवरून जवळीक वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांचा ‘वेस्ट टू वेल्थ’ हा ‘फॉर्म्युला’ केजरीवाल यांना चांगलाच आवडल्याने ते नागपुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट देणार असून, दिल्लीत याच प्रकल्पाची पुनरावृत्ती करण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - कधीकाळी एकमेकांवर चिखलफेक करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांच्यात दिल्लीतील यमुना नदी स्वच्छतेवरून जवळीक वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांचा ‘वेस्ट टू वेल्थ’ हा ‘फॉर्म्युला’ केजरीवाल यांना चांगलाच आवडल्याने ते नागपुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट देणार असून, दिल्लीत याच प्रकल्पाची पुनरावृत्ती करण्याची शक्‍यता आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर गडकरी यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावाही ठोकला होता. याची दखल घेत दिल्ली न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये केजरीवाल यांच्यावर आरोप दाखल केले होते. गडकरी-केजरीवाल यांच्या या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. केजरीवाल यांनी गडकरी यांची लिखित माफी मागून प्रकरणावर पडदा पाडला होता. आता उभय नेत्यांत मैत्रीचे नाते आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी निमित्त ठरले दिल्लीतील यमुना नदी स्वच्छता अभियान. यमुना नदीच्या स्वच्छतेवरून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मागील आठवड्यात गुरुवारी दिल्लीतील परिवहन भवन येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या बैठकीत यमुना नदीत दिल्लीतील सांडपाणी जात असल्याने त्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यावर चर्चा झाली. यासाठी केंद्राच्या शहर विकास मंत्रालयाने आर्थिक मदतीचा मुद्दाही पुढे आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून स्वच्छ केलेले पाणी विकण्याचा सल्ला केजरीवाल यांना दिल्याचे उच्चस्तरीय सूत्राने सांगितले. एवढेच नव्हे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’चा कानमंत्र देत सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सीएनजी तयार करण्याचीही सूचना केली. नागपुरात भांडेवाडी येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र असून महापालिकेने प्रक्रिया केलेले पाणी महावितरणला विक्री केले असून, त्यातून १५ कोटी रुपये वार्षिक मिळत आहे. केंद्रीय मंत्री गडकरींची कल्पना आवडल्याने मुख्यमंत्री केजरीवाल येत्या २८ जानेवारी रोजी नागपुरातील भांडेवाडीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट देणार असून पाहणी करणार असल्याचे समजते.

बेरजेच्या राजकारणाचा परिणाम 
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहीर भाषणातून अनेकदा राजकारणात कुणी कायमचे शत्रू नसतात, असे सांगितले आहे. त्यांच्या बेरजेच्या राजकारणामुळेच अनेक पक्षांत त्यांचे मित्र आहे. या बेरजेच्या राजकारणामुळे भविष्यात केजरीवालही गडकरींचे चांगले मित्र ठरतील, अशी चर्चाही यानिमित्त रंगली आहे. यापूर्वीही एप्रिल २०१६ मध्ये केजरीवाल यांनी गडकरींची भेट घेतली होती. त्यानंतर ‘आपल्या भेटीने आनंद झाला. वेगवेगळ्या विभागांच्या मदतीसाठी धन्यवाद’, असे ट्‌विट करून केजरीवाल यांनी गडकरींचे आभार मानले होते.

Web Title: nagpur news Kejriwal will be in Nagpur after consulting Gadkari