परमसुंदरी... दिव्यसुंदरी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नागपूर - ड्रीमगर्ल... स्वप्नसुंदरी... अशा उपमांसह भारतीय चित्रपट रसिकांच्या मनात घर करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी आज नागपूरकरांपुढे द्रौपदीच्या रूपात आल्या. द्रौपदीच्या सखी तिचे वर्णन करण्यासाठी ‘परमसुंदरी, अपूर्वसुंदरी... सखी हमारी दिव्यसुंदरी’ या शब्दांत वर्णन करतात; तेव्हा त्या साक्षात हेमामालिनी यांच्याच सौंदर्याचे वर्णन करीत असल्याची प्रचिती येते. या सुरेख कार्यक्रमाने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज (रविवार) समारोप झाला.

नागपूर - ड्रीमगर्ल... स्वप्नसुंदरी... अशा उपमांसह भारतीय चित्रपट रसिकांच्या मनात घर करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी आज नागपूरकरांपुढे द्रौपदीच्या रूपात आल्या. द्रौपदीच्या सखी तिचे वर्णन करण्यासाठी ‘परमसुंदरी, अपूर्वसुंदरी... सखी हमारी दिव्यसुंदरी’ या शब्दांत वर्णन करतात; तेव्हा त्या साक्षात हेमामालिनी यांच्याच सौंदर्याचे वर्णन करीत असल्याची प्रचिती येते. या सुरेख कार्यक्रमाने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज (रविवार) समारोप झाला.

ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘द्रौपदी’ नृत्यनाटिकेचा आस्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती होती. प्रतिभा राय यांच्या ‘याग्यसेनी’ कादंबरीवर आधारित ही नृत्यनाटिका होती. रवींद्र जैन यांचे संगीत आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, रूपकुमार राठोड या दिग्गजांचे स्वर नाटिकेची उंची वाढविणारे ठरले. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर द्रौपदीच्या सखी तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्याचा प्रसंग उभा करण्यात आला. या प्रसंगात कृष्णाचा प्रवेश लक्षवेधी ठरतो. सुप्रसिद्ध अभिनेता राजेश श्रुंगारपुरे याने कृष्णाची भूमिका साकारली. द्रौपदीचे स्वयंवर आणि अशा अनेक लक्षवेधी प्रसंगांमधून नागपूरकर प्रेक्षकांना हेमामालिनी यांच्या अभिनयासह शास्त्रीय नृत्याची मेजवानी मिळाली.

दरवर्षी महोत्सवाचे ‘कमिटमेंट’ 
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात खासदार सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताच प्रेक्षकांनी त्याला दाद दिली. गडकरी यांनी आपल्या भाषणात ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी आयोजित करेन,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ‘दबंग’ पदवीला साजेसे ‘कमिटमेंट’ केले. 

गडकरी ‘दबंगांचे हेडमास्तर’
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मला यायचे होते. पण, सलमान खान येणार असल्याचे कळले. ‘एक म्यान में दो तलवारे नहीं रह सकती’ तसे दोन दबंग एका ठिकाणी राहू शकत नाहीत, म्हणून मी टाळले, अशी मिश्‍किली करीत, नितीन गडकरी दबंगांच्या शाळेचे हेडमास्तर आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नरनारायण आरोग्यसेवा या अद्ययावत फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. व्हॅल्युएबल ग्रुपच्या सहकार्यातून एक कोटी रुपये किमतीचे हे रुग्णालय निर्माण झाले. पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आफ मेडिकल सायन्स रिसर्च अँड ह्युमन रिसोर्सेस यांच्या माध्यमातून ही सेवा शहर व ग्रामीण भागात पुरविली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, व्हॅल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे व अमेय हेटे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news khasdar cultural event