तलावांतील जीवांचा गुदमरणार श्‍वास 

राजेश प्रायकर 
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नागपूर - गेल्या तीन दिवसांत अनेक नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला असला तरी काहींनी नैसर्गिक तलावांमध्येच गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरल्याने पर्यावरणपूरक विसर्जनाला गालबोट लागले. पहिल्या तीन दिवसांतील चित्रामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तीचेही विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये होण्याची शक्‍यता बळावली असून, त्यामुळे तलावांतील जीवांचा श्‍वास गुदमरणार आहे. मुळातच शहरातील तलावांतील ऑक्‍सिजनमध्ये घट झाली असून, विसर्जनामुळे त्यात आणखी घट होणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या सुविधांसाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी १९० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. 

पीओपी मूर्ती वाढविणार जडत्व 
शहरात यंदाही पीओपी मूर्तीची बिनधास्त विक्री करण्यात आली. महापालिकेने पीओपी मूर्ती विक्रेत्यांना रानच मोकळे करून दिले होते. पीओपी विक्रेत्यांनी मूर्तींवर लाल रंगाचे निशाणही लावले नसल्याचे दिसून आले. यंदा जनजागृतीचाही अभाव दिसून आला. त्यामुळे नागरिकांनीही सुबक व आकर्षक रंगसंगतीमुळे पीओपी मूर्तीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अनंत  चतुर्दशीला या घरगुती मूर्तीही तलावांमध्ये विसर्जित केले जाण्याची शक्‍यता आहे. पीओपी मूर्तीमुळे पाण्याचे जडत्व वाढणार असून, पाण्यातील मासे आदीचा श्‍वास गुदमरणार आहे.

रासायनिक रंग रोखणार ऑक्‍सिजन 
मूर्ती मातीची असो की पीओपी, ती आकर्षक करण्यासाठी अद्याप नैसर्गिक रंगांचा वापर केला  जात नाही. मोठ्या प्रमाणात रासायनिक रंगांचा वापर मूर्तीचे आकर्षण वाढविण्यासाठी केला जातो. महापालिका, सामाजिक संस्थांकडून जनजागृतीनंतरही काही नागरिक तलावांमध्येच मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देताना दिसून येत आहे. या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे तलावावर तैलीय थर जमा होणार असून, त्यामुळे वातावरणातील ऑक्‍सिजन तलावात विरघळण्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी ऑक्‍सिजनच्या प्रमाणात आणखी घट होण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

पर्यावरणपूरक विसर्जन केवळ महापालिका किंवा सामाजिक संस्थांची जबाबदारी नाही. ही जबाबदारी पार पाडताना नागरिकांना विशेष कष्ट घेण्याचीही गरज नाही. त्यांनी महापालिकेने नजीकच उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे. महापालिकेनेही विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तत्काळ निर्माल्य, विसर्जित मूर्ती बाहेर काढून तलाव स्वच्छ  केल्याची प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. 
- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ व संस्थापक, ग्रीन व्हिजिल.

Web Title: nagpur news lake