शेकडो कोटींची उलाढाल, तरी वेदना अपार!

शेकडो कोटींची उलाढाल, तरी वेदना अपार!

नागपूर - शंभर वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीने स्वतःचे वैभव उभे केले. बदलत्या काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही केला. वर्षाला शेकडो कोटींच्या उलाढालीतून लोकाश्रयही सिद्ध झाला. पण, या ‘ग्लॅमर’ला कित्येक वर्षांपासून राजाश्रयाची प्रतीक्षा आहे. मकरंद अनासपुरेसारख्या संवेदनशील सेलिब्रिटीने झाडीपट्टीत प्रवेश केल्यामुळे सरकार दरबारी या वेदनांची झळ पोहोचण्याची एक नवी आशा निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमी गाजविणारे नरेश व आसावरी गडेकर, देवेंद्र लुटे, देवेंद्र दोडके, राजेश चिटणीस, प्रभाकर आंबोणे- वत्सला पोलकमवार, आसावरी नायडू या अनुभवी कलावंतांनी आज दोन नव्या पिढ्यांना रोजगाराचे दालन खुले करून दिले. चार महिन्यांच्या मेहनतीवर अख्खे वर्ष काढणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील समस्यांना या साऱ्याच कलावंतांनी वेळोवेळी वाचा फोडली. ज्येष्ठ कलावंतांचे निवृत्तिवेतन असो वा आठ महिन्यांचा उदरनिर्वाह असो, रंगभूमीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजाश्रयाची गरज वारंवार व्यक्त करण्यात आली. मोहन जोशी, कुलदीप पवार,  रमेश भाटकर यांच्यासारखे दिग्गज कलावंत झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करून गेले. त्यांनीही आपापल्यापरीने प्रयत्न केला. मात्र, आता या रंगभूमीच्या अस्तित्वाचे प्रश्‍न सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मकरंद अनासपुरे याने निर्धार केला आहे. नरेश आणि आसावरी गडेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गद्दार’ या नाटकात मकरंद अनासपुरे याने यावर्षी जानेवारीमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये काम केले. मंगळवारी (ता. २८) रात्री चिमूर येथील नेरी या गावात याचा प्रयोग झाला. पैशाच्या जोरावर राजकारण आणि व्यवस्था आपल्या बोटावर चालविण्याचा प्रयत्न करणारा एक राजकारणी नरेश गडेकर साकारतात. तर पतीचा अत्याचार सहन करणारी आणि तरीही त्याच्या आग्रहाखातर सरंपचपदाची निवडणूक लढविणारी पत्नी आसावरीने साकारली आहे. अफलातून संगीत आणि लाइव्ह गाणे या नाटकाच्या बलस्थानांपैकी एक ठरते. अरुंधती भालेराव, सुनील आष्टीकर, किसन येरम, प्रणाली राऊत, शिल्पा शाहीर, विजय पवार, अरविंद झाडे, सायली कुबडे, अमर मसराम, रुपेश राऊत, राकेश राऊत, राहुल राऊत, पठाण बाबू, विनोद शेंडे या कलावंतांच्या महत्त्वपूर्ण योगदानातून हा प्रयोग उभा होतो. 

मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचवणार - मकरंद
महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागात रात्रीचा दिवस होईपर्यंत मनोरंजनाचे साधन ठरलेली झाडीपट्टीची रंगभूमी खरे तर शेतकऱ्यांची रंगभूमी आहे. त्यामुळे येथील लोकांच्याही समस्या आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्‍न आहेत. त्यांनी एका बंद लिफाफ्यात आपल्या अडचणी माझ्याकडे दिल्या आहेत. त्या लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून सुपूर्द करणार, असे मकरंद अनासपुरे याने सांगितले. इथे काम करताना एक वेगळा अनुभव येता. पण, त्याहीपेक्षा मला बरेच काही शिकायला मिळते, असेही मकरंद म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com