मस्कासाथमध्ये पुन्हा खचली सिवेज लाइन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नागपूर - शहरातील इंग्रजकालीन जीर्ण सिवेज लाइन नागरिकांसाठी आता दहशतीचे कारण ठरत आहे. शनिवारी पुन्हा मस्कासाथ या वर्दळीच्या भागात रस्त्यावरच जीर्ण सिवेज लाइन खचल्याने या परिसरातील दुकानदार, नागरिकांना येथून प्रवास जोखमीचा झाला आहे. मागील वर्षी याच ठिकाणी जीर्ण सिवेज लाइन खचली होती, हे विशेष.

नागपूर - शहरातील इंग्रजकालीन जीर्ण सिवेज लाइन नागरिकांसाठी आता दहशतीचे कारण ठरत आहे. शनिवारी पुन्हा मस्कासाथ या वर्दळीच्या भागात रस्त्यावरच जीर्ण सिवेज लाइन खचल्याने या परिसरातील दुकानदार, नागरिकांना येथून प्रवास जोखमीचा झाला आहे. मागील वर्षी याच ठिकाणी जीर्ण सिवेज लाइन खचली होती, हे विशेष.

शनिवारी दुपारी मस्कासाथ येथील वर्दळीच्या रस्त्यावर अचानक खोल खड्डा तयार झाला. या खड्ड्याच्या आजूबाजूने वाहने जात असल्याने खड्डा आणखीच खचत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी या परिसरातील नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक रमेश पुणेकर यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

खड्ड्याच्या आजूबाजूला तत्काळ बॅरिकेड्‌स लावण्यात आले. तोपर्यंत या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. येथील व्यापारी व नागरिकांनी जीर्ण सिवेज लाइन नेहमीच खचत असल्याने भीती निर्माण झाल्याचे सांगितले. या भागातील रस्ते या जीर्ण सिवेज लाइनवरून असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्‍यताही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. मागील वर्षी मार्चमध्येही याच भागात जीर्ण सिवेज लाइन खचल्याने ४५ फूट खोल खड्डा तयार झाला होता. या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी सांडपाणी व्यवस्थितरीत्या वाहून जाण्यासाठी महापालिकेने ८ महिन्यांचा कालावधी लावला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याची लागणही झाली होती. महापालिकेने केलेल्या कामाच्या नजीकच आज खड्डा पडल्याने कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाचेही पितळ उघडे पडले. सातत्याने जीर्ण सिवेज लाइन खचत असल्याने या परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली. 

दोन वर्षांपूर्वी अंबाझरीत घटना
सिवेज लाइन खचण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. २९ जून २०१५ रोजी अलंकार टॉकीज चौकातही जीर्ण सिवेज लाइन खचली होती. त्यामुळे घाणपाणी तुंबले होते. येथेही चेंबर तयार करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. आजही येथून प्रवास करताना नागरिक भीती व्यक्त करतात.

आठ महिन्यांपूर्वी महापालिकेने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. जीर्ण सिवेज लाइन धोकादायक झाली असून, येथे कंत्राटदाराने केलेल्या कामांवर अधिकाऱ्यांचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळे नुकताच केलेला ४० लाखांचा खर्च व्यर्थ ठरला. निकृष्ट दर्जाच्या कामाची आयुक्तांनी चौकशी करावी. 
-आभा पांडे, नगरसेविका.

उपमहापौरांनी केला दौरा
मस्कासाथ येथे सिवेज लाइन खचल्याचे समजताच उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही पाहणी केली. यावेळी त्यांनी अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता राजेश भुतकर यांना दिले. खड्डा पडलेल्या ठिकाणी चेंबर तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

Web Title: nagpur news maskasath terriost