नऊ हजार कोटींचा विस्तार आराखडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर - शहरातील प्रस्तावित ३९.८१ किलोमीटरच्या मेट्रो ट्रॅकमध्ये आणखी ३५.६ किमीची भर पडणार आहे. उत्तर-दक्षिण मार्ग कामठी व बुटीबोरीपर्यंत, तर पूर्व-पश्‍चिम मार्ग हिंगण्यापर्यंत वाढणार आहे. कोराडी, वाडीपर्यंतही मेट्रो धावणार असून, मेट्रोच्या विस्तारासाठी ९ हजार २५६ कोटींचा खर्च येणार आहे. हा विस्तारित आराखडा तयार करण्याच्या सूचना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी शुक्रवारी रात्री वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत  आढावा घेतला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महामेट्रो पुणे तसेच नागपूर मेट्रोचे काम करीत आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामाने वेग पकडला असताना दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचेही नियोजन करण्यात येत आहे. बैठकीत खापरी ते बुटीबोरी, आटोमॅटिव्ह चौक ते कामठी तसेच ऑउटर रिंगरोड ते वाडी आदी भागातील विस्ताराचे सादरीकरण केले. आटोमॅटिव्ह चौक ते कामठी ९.६ किमी, वासुदेवनगर ते वाडी ५, लोकमान्यनगर ते हिंगणा ३, प्रजापतीनगर ते कापसी ५ तसेच खापरी ते बुटीबोरी १३ किमी अशा एकूण ३५.६ किमी लांबीच्या विस्तारित प्रकल्पासाठी ९ हजार २५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रोसाठी जमिनीचे अधिग्रहण, मल्टी मोडल स्थानक, इंटीग्रेशन, खापरी स्थानक येथे अंडरपासचे बांधकाम, इको पार्क, मेट्रो सिटी तसेच व्हीसीए मेट्रो स्थानक आदींचे बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

स्टेशनचे भूमिपूजन मार्चमध्ये होणार
अजनीत जागतिक दर्जाच्या इंटर मोडल स्थानक उभारण्यात येत आहे. येथे रेल्वे, मेट्रो, बस  एकाच ठिकाणी राहणार आहे. रेल्वे परिसरातील जागा तसेच राज्य शासनातर्फे इतर जागाही  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रस्तावित स्थानकाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात मार्चमध्ये होईल यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. खापरीत लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार असून, दोन्ही प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १ हजार  ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली.

Web Title: nagpur news metro