मेयोतील परिचारिका तणावात

मेयोतील परिचारिका तणावात

नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) लेबर वॉर्डात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गर्दी असते. रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना परिचारिकांची संख्या मात्र कमी होत आहे. दररोज ३०-३५ प्रसूती होत असताना कमी परिचारिकांच्या भरवशावर काम सुरू आहे. अतिकामामुळे परिचारिका तणावात असून, कोणत्याही क्षणी परिचारिका किंवा त्यांच्या नातेवाइकांकडूनही उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.  

मेयोच्या लेबर वॉर्डात तीन पाळ्यांमध्ये तब्बल २१ परिचारिकांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात सात जणींवर कामाचा भार आहे. विशेष म्हणजे, ५९२ खाटांसाठी आवश्‍यक मनुष्यबळ आहे. नवीन अडीचशे खाटांची रुग्णालयात भर पडली. 

सर्जिकल कॉम्प्लेक्‍स तयार झाले. कॅज्युअल्टी तयार झाली. भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषानुसार दररोज नवीन विभाग सुरू केले जातात; परंतु मनुष्यबळ तेवढे वाढविले जात नाही. मेयोत परिचारिकांची ४७५ पदे मंजूर आहेत. यातील ७५ पदे रिक्त आहेत. अवघ्या चारशे परिचारिकांच्या भरवशावर मेयोमध्ये रुग्णसेवेचा पसारा सांभाळला जातो. यामुळेच परिचारिका तणावाखाली आहेत. अनेक परिचारिकांचे मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. 

लेबर वॉर्डाशेजारी टीबी वॉर्ड
लेबर वॉर्डानजीक टीबीचा वॉर्ड आहे. अडचणीच्या वेळी महिलांना क्षयरुग्णांच्या वॉर्डात भरती केले जाते. टीबी वॉर्ड आयसोलेटेड असावा, हे साऱ्या डॉक्‍टरांना माहीत असताना अधिष्ठाता महोदयांनी टीबी वॉर्ड कोणत्या निकषानुसार तयार केला, हेच कळायला मार्ग नाही. प्रसूत मातांसह बाळांनाही टीबी संसर्गाचा धोका आहे, हे डॉक्‍टरांना कळत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. 

२८३ पदांचा प्रस्ताव थंडबस्त्यात
मेयोत वाढत्या विभागांची संख्या लक्षात घेता वर्षभरापूर्वी २८३ परिचारिकांची पदे भरण्यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. विशेष म्हणजे, मेयोतील त्रुटींबाबत खडान्‌खडा माहिती असलेले सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे वैद्यकीय संचालक कार्यालयात असताना या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. 

या पर्यायांचा विचार व्हावा
मेडिकलमध्ये साडेअकराशे तर सुपरमध्ये अडीचशेवर परिचारिका आहेत. मेडिकलच्या विविध लाइट वॉर्डांमध्ये पाच ते सहा परिचारिका कार्यरत आहेत. हीच स्थिती त्वचारोग आणि सुपर स्पेशालिटी विभागात आहे. मेडिकल आणि सुपरमधील परिचारिकांना मेयोत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्यास मेयोतील परिचारिकांच्या अल्प मनुष्यबळावर तात्पुरती मलमपट्टी करता येईल, अशी चर्चा खुद्द मेयोत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com