मुख्यमंत्री महोदय, बुटीबोरी एमआयडीसीतील बंद कारखाने सुरू होतील?

जितेंद्र वाटकर 
सोमवार, 15 जानेवारी 2018

टाकळघाट - आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी येथे वसली आहे. परंतु, या एमआयडीसीतील अर्ध्यापेक्षा अधिक कारखाने बंद असल्याने ते सुरू होणार का, असा सवाल नागरिकांना पडला आहे.

टाकळघाट - आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी येथे वसली आहे. परंतु, या एमआयडीसीतील अर्ध्यापेक्षा अधिक कारखाने बंद असल्याने ते सुरू होणार का, असा सवाल नागरिकांना पडला आहे.

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र गेल्या ३० वर्षांपासून विकासाच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. येथे पन्नास टक्‍के भूखंड रिकामे आहेत. त्यासाठी नागरिक व प्रशासन पुढे यायला तयार नाही. औद्योगिक विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार २२०९ भूखंड वाटप करण्यात आले. त्यातून १२१४ भूखंडांवर उत्पादन झाले. ९९५ भूखंड आजही रिकामेच दिसतात. ते ज्यांच्या मालकीचे आहेत, त्यांना उत्पादन नसल्याने ते भूखंड परत करायचे. परंतु, अजूनपर्यंत उद्योजकांना जाग आली नाही. 

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीजवळ २४२८.१४ हेक्‍टर जमीन आहे. त्यात २६३२ भूखंड विकसित करण्यात आले. त्यातून २२०९ भूखंड वाटप करण्यात आले. यातील १२१४ भूखंडांवर उत्पादन सुरू झाले. ९९५ भूखंड रिकामे पडले. त्यासोबतच ४२३ भूखंड वाटप होणार होते. परंतु उत्पादन सुरू झाल्यावर १९३ कारखान्यांतून उत्पादन बंद पडले. ही आकडेवारी २-३ महिन्यांच्या अगोदरच्या कालावधीतील असून सध्याच्या स्थितीत ३५० कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. 

त्यातील सर्वांत मोठे युनिट्‌स म्हणजे स्पेसवूड आणि साजफूड असे आहे.  या दोन्ही कंपन्या सीएटसारख्या मोठ्या कंपनीनंतर १०० कोटींची गुंतवणूक करत असल्याची माहिती आहे.त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने सोमवारी बुटीबोरी एमआयडीसीमधील एका कंपनीच्या उद्‌घाटनासाठी येत असल्याने येथील बंद कारखाने सुरू होणार का, अशी आर्त हाक भूमिपुत्र तसेच कामगार देत आहेत.

बेरोजगारांच्या लोकप्रतिनिधींविषयी बोंबा
एमआयडीसीलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. अत्यंत अल्प प्रमाणात मोबदला मिळाला. त्या भूमिपुत्रांना आशा होती की कुठेतरी रोजगार मिळेल. परंतु, स्थानिक लोकांना रोजगार न देता परप्रांतीयांना मिळत असल्याने स्थानिक बेरोजगारांच्या समस्या वाढतच आहेत. लोकप्रतिनिधी रोजगार देण्याची आश्‍वासने देतात; परंतु त्यांचे आश्‍वासन कधीच पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारी मिटवू, अशी खोटी आश्‍वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल बेरोजगारांच्या बोंबा ऐकू येत आहेत.

नवीन एमआयडीसीचे काय?
वर्धा मार्गावर नवीन एमआयडीसी स्थापन झाली. तिची ओळख अतिरिक्त एमआईडीसी बुटीबोरी-२ अशी आहे. ती १३१४.०४ हेक्‍टरमध्ये विकसित झाली आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलासुद्धा मिळाला. परंतु, त्या ठिकाणी अजूनपर्यंत एकही कारखाना नाही. दुसरीकडे निम्म्यापेक्षा जास्त कारखाने बंद असून नव्याने कारखाने उघडण्यात येत आहेत. बुटीबोरीत जमीन घेण्यासाठी उद्योजकांची काहीच कमी नाही. परंतु नवीन एमआयडीसीत चाललेय काय, हेच कळायला मार्ग नाही.

Web Title: nagpur news midc factory