परीक्षेच्या दोन तासांपूर्वी मिळाले प्रवेशपत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लेटलतिफी हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. विद्यापीठाच्या लेटलतीफ व भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना बी.कॉम. आणि बीसीसीएच्या परीक्षेत पाहण्यात आला. परीक्षेच्या दोन तासांपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले. यामुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लेटलतिफी हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. विद्यापीठाच्या लेटलतीफ व भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना बी.कॉम. आणि बीसीसीएच्या परीक्षेत पाहण्यात आला. परीक्षेच्या दोन तासांपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले. यामुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

बी.कॉम. आणि बीसीसीएची परीक्षा मंगळवारी (ता. २४) सुरू झाली. दुपारी २ वाजता पेपर  होता. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेचा दिवस उजाडूनही प्रवेशपत्र मिळालेले नव्हते. परीक्षा होणार का, वर्ष वाया तर जाणार नाही या विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजता प्रवेशपत्र दिले. दोन तासांपूर्वी मिळालेल्या प्रवेशपत्रामुळे विद्यार्थ्यांचा जीवात जीव आला. परंतु, विद्यापीठाच्या या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

या प्रकारामुळे मानसिकरीत्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारण्याजोगी नसल्याची भावना व्यक्त केली. या प्रकारचा गोंधळ कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात घडल्याची माहिती पुढे आल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. 

४० विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठी सोमवारी व मंगळवारी सकाळी प्रयत्न केला. मात्र, संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात नमूद केलेल्या विषयाची संलग्नता प्राप्त केली नसल्याची माहिती पुढे आली. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामत: या विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

२५ महाविद्यालयांचे प्रस्ताव
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. त्या आधारे परीक्षा विभाग विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र तयार करतात. महाविद्यालयातर्फे आवश्‍यक ती कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेशपत्र देण्यात येते. यासाठी प्रथम महाविद्यालयाला ऑनलाइन पद्धतीने आयडी पाठविण्यात येतो. त्यानुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढावे लागते. या प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे २५ महाविद्यालयांनी आवश्‍यक ती कारवाई पूर्ण केली नाही. यामुळे महाविद्यालयांनी विद्यापीठाला प्रस्ताव पाठविले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरित केले.

Web Title: nagpur news nagpur university education

टॅग्स