मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गडकरींच्या समर्थनाचे पोस्टर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

नागपूर - राज्यातील नगरनियोजन खाते "बोगस' व "निरुपयोगी' असल्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याचे समर्थन व स्वागत करणारे पोस्टर नागपुरातील धरमपेठेत मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ झळकले आहे. या पोस्टरवर कुणाचेही नाव नाही. "नागपुरीयन' असे नमूद केल्याने गडकरींच्या वक्तव्याचे स्वागत करणारे पोस्टर लावणारा कोण, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजनबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात राज्याचे नगरविकास खाते "निरुपयोगी' व "बोगस' असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. राज्याचे नगरविकास व नियोजन खाते खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे. या वक्तव्यावर सीएमओने कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत व्यक्त केलेली नाही. 

पुण्यात गडकरींनी केलेल्या वक्तव्याचे प्रतिसाद मात्र नागपुरात उमटले आहेत. नागपुरात धरमपेठ भागातील कॉफी हाउस चौकात गडकरींच्या वक्तव्याचे समर्थन व स्वागत करणारे पोस्टर लागले आहे. कॉफी हाउस चौकापासून मुख्यमंत्री फडणवीस यांचे घर हाकेच्या अंतरावर आहे. या पोस्टरवर नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचे जाहीर स्वागत केले आहे. एवढेच नव्हे तर नितीनजी, प्रत्येक प्रामाणिक नागरिक आपल्या वक्तव्याशी सहमत असल्याचेही नमूद केले आहे. अवैध बांधकाम, भूखंड बळकावणारे, नागरिकांना त्रास देणारे, बिल्डरांना पाठीशी घालणारे व शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ करणाऱ्या भ्रष्टाचारी व निरुपयोगी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही या पोस्टरवर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ हे पोस्टर लावण्यामागे कोणता हेतू किंवा उद्देश असावा, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: nagpur news nitin gadkari Devendra Fadnavis