नागपूरच्या अधिवेशनाला विरोध नाही  - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे हे सरकारला ठरवायचे आहे. नागपूरमध्ये घेतले तरी आमची हरकत नाही. आम्ही विरोधकांची भूमिका चोख बजावू, सरकारला जाब विचारू आणि जनतेचे प्रश्‍नही मांडू, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

नागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे हे सरकारला ठरवायचे आहे. नागपूरमध्ये घेतले तरी आमची हरकत नाही. आम्ही विरोधकांची भूमिका चोख बजावू, सरकारला जाब विचारू आणि जनतेचे प्रश्‍नही मांडू, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

भंडार-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे यावर वाद सुरू आहे. मुंबईत आमदार निवास पाडण्यात येणार असल्याने ते नागपूरमध्ये घ्यावे असा भाजपचा आग्रह आहे. शिवसेनेचा मात्र विरोध आहे. या संदर्भात संसदीय कामकाज विभागातर्फे त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला असला तरी घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी नागपूरला विरोध दर्शवला नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात होती, असेही त्यांनी सांगितले. 

निरंजनने आधीच ठरविले होते 
निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यांनी सांगितलेली कारणे तकलादू होती. भाजपात जाण्याचे त्यांनी आधीच ठरविले होते. राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना मिळणार होती. मात्र, भाजपचे लोक गळ टाकून बसलेले आहेत, असे सांगताना आमदार नरेंद्र पाटील पक्ष सोडून जाणार नाही, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 

गाजर दाखविण्याचे काम 
भाजप गाजर दाखविण्यात पटाईत आहे. अधिवेशनाच्या आधी आणि अधिवेशनाच्या नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळाचे वाटप केले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी साडेतीन वर्षे काढली. घोषणा करून व आश्‍वासने द्यायची मात्र त्याचा लाभ प्रत्यक्षात द्यायचा नाही, असे भाजपचे धोरण असल्याची टीका पवार यांनी केली. 

Web Title: nagpur news No opposition to the Nagpur session says Ajit Pawar