पेट्रोल पंपांवरून रोज ३५ लाखांची लूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - पल्सर चिपच्या माध्यमातून एकट्या नागपूर जिल्ह्यात दररोज सरासरी ३५ लाख रुपयांनी ग्राहकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाचा हिशेब काढल्यास ही लूटमार कोट्यवधींच्या घरात जाते. ग्राहकांच्या खिशाला कात्री मारून पेट्रोलपंप चालकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. 

नागपूर - पल्सर चिपच्या माध्यमातून एकट्या नागपूर जिल्ह्यात दररोज सरासरी ३५ लाख रुपयांनी ग्राहकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाचा हिशेब काढल्यास ही लूटमार कोट्यवधींच्या घरात जाते. ग्राहकांच्या खिशाला कात्री मारून पेट्रोलपंप चालकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. 

मुंबई पाठोपाठ नागपूरमध्येसुद्धा क्राइम ब्रॅंचने छापे टाकुन आतापर्यंत तीन पेट्रोलपंपावर पल्सर चिप जप्त केल्या. अशा चिप लावलेल्या पंपांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे कळते. त्यावर क्राइम ब्रॅंच नजर ठेवून आहे. टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे. त्यामुळे आणखी अनेक पंप क्राईम ब्रॅंचच्या तावडीत सापडणार असल्याची चर्चा आहे. ठाणे गुन्हे शाखेने पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये पल्सर चिप बसविणारा मास्टरमाइंड प्रा. विवेक शेट्येला अटक  केली. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांचे ‘पाप’ चव्हाट्यावर आले आहेत. 

नागपूर शहरात एकूण ८६ पेट्रोल पंप आहेत. शहरासह जिल्ह्यात एकूण ३५० पेट्रोल पंप आहेत. नागपूर शहरातून सुमारे ५ लाख लिटर पेट्रोलची दिवसाला विक्री होते. जिल्ह्यातून १२ लाख ५० हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. ७९ रुपये प्रतिलिटरप्रमाणे एकूण ९ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांच्या दररोज विक्री होते. पल्सर चिप पेट्रोल वेंडीग मशीनमध्ये बसवल्यास जवळपास प्रतिलिटर ४० ते ८० मिलि प्रतिलिटर सरासरी पेट्रोलची चोरी केली जात आहे. कमीतकमी चाळीस मिलि प्रतिलिटर चोरीचे प्रमाण घेतल्यास दररोज ३५ लाख रुपये किमतीचे पेट्रोल पंपमालक चोरी करीत असल्याचे उघड होते. चोरीशिवाय वेगवेगळ्या युक्‍त्या वापरूनही ग्राहकांची लूट केली जात आहे.  वैधमापन अधिकारी यांना ‘सेट’ केल्यास दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची रक्‍कम पेट्रोल पंपचालक कमावतात. हा सर्व पैसा सामान्य जनतेचा खिशातून चोरला जात आहे. गुन्हे शाखेच्या छापेमारीमुळे पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, सामान्य नागरिकांना या कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे.

Web Title: nagpur news petrol pump chip scam