जनावरांच्या जिवावर उठले प्लॅस्टिक

कॉटन मार्केट - पालापाचोळ्यासह प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्यावर ताव मारणाऱ्या गाई.
कॉटन मार्केट - पालापाचोळ्यासह प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्यावर ताव मारणाऱ्या गाई.

नागपूर - संपूर्ण शहराला वापरलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा विळखा पडला असून शहरातील कचरा संकलन केंद्र, भाजीबाजारात फिरणाऱ्या गाई, म्हशी त्यावर ताव मारताना दिसून येत आहे. शिळे अन्न किंवा कुठलेही पदार्थ, भाज्यांचा पालापाचोळा खाताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक किंवा त्यांचे तत्त्व जात असून त्यामुळे दरवर्षी शेकडो जनावरांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक वास्तव्य पुढे आले आहे. एवढेच नव्हे जिल्हा पशुवैद्यकीय केंद्रात जनावरांवरील शस्त्रक्रियेदरम्यान अनेकदा पोटात प्लॅस्टिकचे गोळे निघत असल्याचे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमुद केले. 

जीवनातील अनेक समस्यांपैकी पर्यावरण प्रदूषण प्रमुख असून, प्लॅस्टिक या समस्येचा मुख्य घटक आहे. एका अहवालानुसार प्लॅस्टिकमुळे देशात दररोज ५८० व्यक्ती मृत्यू पावतात. जगात हे प्रमाण चौदा हजार प्रती दिन आहे. मानवी जीवनाप्रमाणेच जनावरांनाही प्लॅस्टिकचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहेत. या कचरा संकलन केंद्रावर बेजबाबदार नागरिक प्लॅस्टिकच्या पिशव्यातून शिळे अन्न, भाज्यांचा पालापाचोळाही टाकताना आढळून येते. कॉटन मार्केट, सक्करदरा भाजी बाजार येथील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या दिसून येते. भाजी बाजारातील पालापाचोळा आणि प्लॅस्टिक एकाच ठिकाणी गोळा केले जात आहे. परिणामी पालापाचोळा खाण्यासाठी आलेल्या गाई, म्हशी प्लॅस्टिकही खात आहेत. अनेक नागरिक गाईंना नैवद्य प्लॅस्टिकच्या पिशवीतून देतात. शहरातील बहुतांश सभागृहाच्या परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिक कटोरी, चमचे आदी पसरलेले दिसते. प्लॅस्टिक कटोरीला विविध पदार्थांची चव किंवा गंध असल्याने गाई, म्हशी त्याकडे आकर्षित होतात. या कटोरी, चमचेही अनेकदा जनावरे गिळून घेतात. त्यामुळे वर्षाला शेकडो जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे या जनावरांना विविध रोगांची लागण झाली आहे. अनेकदा जनावर मालक पशु रुग्णालयात जनावरांना घेऊन जाते. पशुवैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया करतात. या शस्त्रक्रियेत जनावरांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक निघत असल्याचे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने नमुद केले. एवढेच नव्हे दरवर्षी शेकडो जनावरे प्लॅस्टिकला बळी पडत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

प्रजनन, दुग्धोत्पादन क्षमतेवर परिणाम 
वापरलेल्या प्लॅस्टिकमुळे प्राण्यांवर विपरीत परिणाम होतो. यामुळे त्यांचा मृत्यू तर होतोच, शिवाय प्लॅस्टिक पोटात गेल्यावर त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवरही परिणाम झालेला दिसतो. अनेकदा गाईचे वासरू अपंग जन्माला येते. प्लॅस्टिकमुळे गाई, म्हशींच्या दुग्धोत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. मात्र, गाई, म्हशीमालकही यापासून अनभिज्ञ आहेत.

महापालिकेकडून ना जनजागृती, ना कारवाई 
शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. परंतु सर्रास याचा वापर दिसून येत आहे. यावर महापालिकेकडून कारवाईत सातत्य नसल्याने दुकानदारांचीही हिंमत वाढली आहे. याशिवाय प्लॅस्टिक बंदीसाठी जनजागृतीचाही अभाव आहे. परिणामी शहरातील दुकाने, हॉटेल्स, भाजी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com