आम्हाला नको पोलिसांची सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नागपूर  - धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्नशील असतात. परंतु, सुरक्षेचे कारण पुढे करीत पोलिसांनी यावर्षी मुख्य रस्त्याच्या दुर्तफा स्टॉल लावण्यावर बंदी घातली.  यामुळे आंबेडकरी संघटना व कार्यकर्त्यांमध्ये प्रक्षोभ उफाळून आले. कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनालाही घेरले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता स्टॉल लावण्यास परवानगी दिली.

नागपूर  - धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्नशील असतात. परंतु, सुरक्षेचे कारण पुढे करीत पोलिसांनी यावर्षी मुख्य रस्त्याच्या दुर्तफा स्टॉल लावण्यावर बंदी घातली.  यामुळे आंबेडकरी संघटना व कार्यकर्त्यांमध्ये प्रक्षोभ उफाळून आले. कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनालाही घेरले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता स्टॉल लावण्यास परवानगी दिली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी स्टॉलसंदर्भात निर्णय होणार होता. परंतु, पोलिसांनी अखेरपर्यंत स्टॉल लावण्याची परवानगी नाकारली. यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी थेट नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांना टार्गेट केले. ‘आम्हाला नको पोलिसांची सुरक्षा...’ असा पवित्रा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या वेळी एकही पोलिस नव्हता... समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. ६१ वर्षांच्या परंपरेला छेद देत दीक्षाभूमीवरील पुस्तक विक्रीला विरोध करण्यासाठी स्टॉल बंदी करीत असून, येथील वाचन संस्कृती उद्‌ध्वस्त करण्याचा डाव रचल्याचा आरोप रवी शेंडे, वैभव कांबळे, सचिन रामटेके, आशीष फुलझेले, भगवान शेंडे, सुनील जवादे, सिद्धांत पाटील, मुकेश मेश्राम, राजू वैरागडे, अजय बोरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला. पालकमंत्री बावनकुळे यांच्या आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात तू-तू, मै-मै झाली. 

पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करीत कार्यकर्त्यांना दोन तासांत निर्णय घेतो असे सांगितले.  अखेर पोलिस आयुक्तांनी स्टॉल लावण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवताच पालकमंत्र्यांनी स्टॉल लावण्यात येतील असे सांगितले. बैठकीला विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त यांच्यासहीत आरोग्य विभाग, परिवहन विभाग, पोलिस प्रशासनाचे अधिकारी होते. 

कार्यकर्त्यांचा विजय
दीक्षाभूमीच्या सभोवताल लहान-मोठे स्टॉल लावून अनुयायांना कायदेशीर सल्ला देण्यापासून, तर फुले-आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टाल लावण्यात येतात. यावर्षी स्टॉल न लावण्याचा पोलिसांनी हुकूम काढला. यामुळे कार्यकर्त्यांनी सोमवारी पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत निदर्शने केली. धम्मदीक्षा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता लक्षात घेता कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत स्टॉल लावण्यास परवानगी दिली. 

दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा सोहळा उत्सव नाही, तर वैचारिक कार्यक्रम आहे. दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी भीमसागर येतो. त्यांच्या प्रेरणेला नख लावण्याचा प्रकार प्रशासनाकडून  होत आहे. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार पोहोचविण्याचे केंद्र  असून, स्टॉल लावण्याची परवानगी मिळाल्याने पोलिस प्रशासनाचे आभार. सुरक्षेत अडथळा येणार नाही.
- रवी शेंडे, शहराध्यक्ष, अ. भा. धम्मसेना.

Web Title: nagpur news police security Dhamma Chakra Pravartan Din