विदेशवारीच्या कारवाईवर अध्यक्षांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - विदेशवारीच्या चौकशी अहवालावर जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर  यांनी आक्षेप घेऊन एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना टार्गेट केले असून, इतरांना पाठीशी  घालण्यात आल्याचा आरोप केला. यामुळे निलंबनाच्या कारवाईतून बचावलेले सर्वच कर्मचारी अडकण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. आजही या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले नाही.

नागपूर - विदेशवारीच्या चौकशी अहवालावर जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर  यांनी आक्षेप घेऊन एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना टार्गेट केले असून, इतरांना पाठीशी  घालण्यात आल्याचा आरोप केला. यामुळे निलंबनाच्या कारवाईतून बचावलेले सर्वच कर्मचारी अडकण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. आजही या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले नाही.

विदेशवारीची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालावरून १० कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. संबंधित फाईल बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या नीता  ठाकरे यांच्याकडे वर्ग केली. मात्र, त्यांनी कारवाईच केली नाही. 

तांत्रिक त्रुटी समोर करून कारवाई करण्याचे टाळले. चौकशी समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अंकुश केदार व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांचा समावेश केला होता. कार्यकारी अभियंत्यांना विदेशवारीची माहिती असल्याचे समोर येताच सीईओंनी समितीतून त्यांना बाहेर काढले. त्याऐवजी वित्त व लेखा अधिकारी अमित अहिरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांचा समावेश केला. 

ठाकरेंची परेड
निलंबनास टाळाटाळ केल्याने सीईओ डॉ. बलकवडे यांनी सकाळीच कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांना बोलावून कानउघाडणी केली तसेच याच जाबही विचारल्याचे कळते. ठाकरे यांनी फाइलीत किरकोळ त्रुटी असल्याने सांगत वेळ मारून नेल्याचे समजते.

कर्मचाऱ्यांची बैठक
कर्मचाऱ्यांनी बुधवारी एका ठिकाणी गुप्त बैठक झाली. यात निलंबित कर्मचारीही  असल्याची माहिती आहे. बैठकीत निलंबनाच्या कारवाईविरोधात आंदोलन करणे, न्यायालयात जाणे ]कारवाई मागे घेण्यासाठी सीईओंवर दबाव आणण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

निलंबित कर्मचारी
बांधकाम विभागाकडून अध्यक्षांना दिलेल्या माहितीनुसार विलास बारापात्रे, मधुकर पाटील, शैलेश ढोकणे, खालीक दुधगोरे, अनिल आकरे, संजय मलके, कनिष्ठ अभियंता विलास लाडे, कनिष्ठ अभियंता डी. डी. बिहारे, कनिष्ठ अभियंता प्रकाश अंतूरकर व कनिष्ठ अभियंता एन. के. कुंभलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे.

सुटीशिवायच विदेशवारी
निलंबनाची कारवाई केलेल्या १० कर्मचाऱ्यांनी सुटीचा अर्जच केला नव्हता. चौकशी समितीच्या अहवालात फक्त बांधकाम विभागातील १० कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केले असून, सिंचन, रोहयो आदी विभागातील १२ कर्मचाऱ्यांना सोडल्याने निशा सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे.

Web Title: nagpur news president objection on Foreign tour