रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - बलात्कार प्रकरणात डेराप्रमुख बाबा गुरमित राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर पंजाब, हरियानात उद्‌भवलेल्या हिंसाचारामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. रविवारी नागपूरमार्गे धावणाऱ्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर आठ गाड्या विलंबाने धावत होत्या. 

नागपूर - बलात्कार प्रकरणात डेराप्रमुख बाबा गुरमित राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर पंजाब, हरियानात उद्‌भवलेल्या हिंसाचारामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. रविवारी नागपूरमार्गे धावणाऱ्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर आठ गाड्या विलंबाने धावत होत्या. 

बलात्कारी बाबाला शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उफाळला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी सोमवारी बाबाला शिक्षा ठोठावली जाणार आहे. यामुळे पुन्हा हिंसाचार बळावण्याची शक्‍यता आहे. पंजाब, हरियानातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक शुक्रवारपासूनच विस्कळीत आहे. शनिवारी नागपूरमार्गे जाणाऱ्या 18237 छत्तीसगड एक्‍स्प्रेस, 16317 हिमसागर एक्‍स्प्रेस आणि 22125 नागपूर-अमृतसर या तीन महत्त्वपूर्ण गाड्या रद्द करण्यात आल्या. रविवारीही रेल्वेवाहतूक पूर्वपदावर येऊ शकली नाही. रविवारी नागपूरमार्गे धावणाऱ्या 16032 वैष्णोदेवी (कटरा)- चेन्नई सेंट्रल एक्‍स्प्रेस, 18238 अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्‍स्प्रेस, 82651 यशवंतपूर-वैष्णोदेवी (कटरा) एक्‍स्प्रेस आणि 16031 सेंट्रल चेन्नई-वैष्णोदेवी (कटरा) एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. 

याशिवाय 12591 गोरखपूर-यशवंतपूर एक्‍स्प्रेस 5 तास 15 मिनिटे, 12410 हजरत निजामुद्दीन-रायगढ 5 तास, 12578 मैसूर- दरभंगा एक्‍स्प्रेस 3 तास, 13425 मालदा-सूरत साप्ताहिक एक्‍स्प्रेस 4.30 तास, 12616 सराय रोहिल्ला-सेंट्रल चेन्नई 3 तास, 18030 शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला एक्‍स्प्रेस 2.30 तास व हजरत निजामुद्दीन 07092 रक्‍सौल-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस या गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. 

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पूर्वकल्पना न घेता वेळेवर रेल्वेस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांना तासन्‌तास रेल्वेस्थानकावर उभे रहावे लागले. मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. 

Web Title: nagpur news railway