रेल्वे अपघात थोडक्‍यात टळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - कामठी मार्गावरील गुरुद्वारालगत असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला तडे गेल्याचे वेळीच लक्षात आल्याने रेल्वेचा संभाव्य अपघात टळला. घटना उघडकीस येताच दिल्लीकडे जाणारा डाऊन मार्ग रेल्वेवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. सर्व रेल्वेगाड्या ‘अप’मार्गावरून संथ गतीने चालविण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांना फटका बसला आहे.

नागपूर - कामठी मार्गावरील गुरुद्वारालगत असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला तडे गेल्याचे वेळीच लक्षात आल्याने रेल्वेचा संभाव्य अपघात टळला. घटना उघडकीस येताच दिल्लीकडे जाणारा डाऊन मार्ग रेल्वेवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. सर्व रेल्वेगाड्या ‘अप’मार्गावरून संथ गतीने चालविण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांना फटका बसला आहे.

सदर ते कडबीचौकादरम्यानचा हा रेल्वेपूल पश्‍चिम व उत्तर नागपूरला जोडणारा मुख्य दुवा आहे. पुलाशेजारी रेल्वेचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी या लोखंडी पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचे गॅंगमनच्या लक्षात आले. वेगात धावणाऱ्या रेल्वेगाडीमुळे पूल कोसळण्याची शक्‍यता होती. हा संभाव्य धोका ओळखून वरिष्ठांना सूचना देत या मार्गावरील रेल्वेवाहतूक तातडीने थांबवून घेण्यात आली. माहिती मिळताच अभियांत्रिकी विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर स्वरूपाचे तडे गेले असल्याने युद्धस्तरावर दुरुस्तीकार्य सुरू करण्यात आले. मोठ्या संख्येने गॅंगमनचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या मार्गावर ब्लॉक घेऊन पुलाच्या खालच्या भागात आधार देऊन गर्डरला गेलेले तडे वेल्डींगद्वारे भरून काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन कामाची माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत दुरुस्तीकार्य हाती घ्यावे लागल्याने त्याचा फटका रेल्वेगाड्यांना बसला. तामिळनाडू एक्‍स्प्रेस अडीच तास, तर गोंडवाना एक्‍स्प्रेस पावणेदोन तास नागपूर स्थानकावरच थांबवून ठेवण्यात आली. एपी तेलंगणा एक्‍स्प्रेस फलाट क्रमांक २ वर वळविण्यात आली. दिल्लीमार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या एकाच मार्गावरून संथगतीने चालविण्यात येत असल्याने त्याचा फटका अन्य गाड्यांनाही बसला. या प्रकरणावर कोणतेही भाष्य करणे रेल्वे अधिकाऱ्यांनी टाळले.

रस्ते वाहतूकही रोखली
उत्तर नागपूरला जोडणारा मुख्य दुवा असलेला गुरुद्वारा पूल शहरातील व्यस्ततम मार्गांपैकी एक आहे. पुलाला तडे गेल्याचे लक्षात येताच पुलाखालून होणारी रस्ते वाहतूकही तातडीने थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून वाहनचालकांना थांबविण्यात येत होते. हा मार्ग बंद असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही फेरा मारूनच जाण्याचे कष्ट घ्यावे लागले.

दुरुस्तीकार्य अपूर्ण
ब्रिटिशकालीन या रेल्वेपुलाची कालमर्यादा संपली असून, नव्याने पूल उभारणे आवश्‍यक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे काम खोळंबले आहे. पुलाला गंभीर स्वरूपाचे तडे गेल्याने शनिवारी दुपारपासून दुरुस्तीकार्य हाती घेण्यात आले. मात्र, रात्री अंधारामुळे काम थांबविण्यात आले. रविवारी पहाटेपासून पुन्हा दुरुस्तीकार्य हाती घेतले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: nagpur news Railway accident