पावसाने उडविली दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - मुसळधार पावसाने लागोपाठ तिसऱ्या दिवशी शहराला चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह दुपारी कोसळलेल्या धो-धो पावसाने उपराजधानीची दाणादाण उडविली. हवामान विभागाने विदर्भात सोमवार व मंगळवारीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.  

नागपूर - मुसळधार पावसाने लागोपाठ तिसऱ्या दिवशी शहराला चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह दुपारी कोसळलेल्या धो-धो पावसाने उपराजधानीची दाणादाण उडविली. हवामान विभागाने विदर्भात सोमवार व मंगळवारीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.  

शुक्रवारी व शनिवारी ‘जमके’ बरसल्यानंतर वरुणराजाने रविवारीही शहरातील जवळपास सर्वच भागांत जोरदार ‘बॅटिंग’ केली. दुपारी दोनला सुरू झालेल्या पावसाने नंतर अचानक गिअर बदलविला आणि दोन ते तीन तास विजांचा कडकडाट व मेघगजर्नसह धो-धो बरसला. शहरातील पॉश वस्ती मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाइन्ससह रामदासपेठ, सीताबर्डी, धरमपेठ, गोकुळपेठ, खामला, हजारीपहाड, दाभा, वायुसेनानगर, काटोल रोड, सदर, मानकापूर, गड्‌डीगोदाम, कामठी रोड, मेडिकल चौक, महाल, इतवारी, बेसा, मानेवाडा, मनीषनगर, बेलतरोडी, नरेंद्रनगर,  प्रतापनगर, इंदोरा, नारा-नारी आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. शहरातील इतरही भागांमध्ये दमदार सरी बरसल्या. 

मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. खोलगट भागांना तलावाचे स्वरूप आले होते. गुडघा व मांडीभर पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पाणी गेल्याने अनेकांची वाहने बंद पडली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने   अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. पावसामुळे शहरातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. नाग नदी व पिवळ्या नदींसह शहरातील छोटे-मोठेनाले दुथडी भरून वाहिले. अनेक वस्त्या बराच वेळपर्यंत पाण्यात होत्या. 

दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, नागपूर जिल्ह्यातील सरासरी पावसाच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात  सध्या मॉन्सून सक्रिय आहे. हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

पावसामुळे आनंदावर विरजण!  
जोरदार पावसामुळे नागपूरकरांना ‘संडे’ चार भिंतीच्या आड घालवावा लागला. सुटीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, भरपावसातही काहींनी अंबाझरी तलावावर ‘ओव्हरफ्लो’चा आनंद घेतला.

Web Title: nagpur news rain