प्रादेशिक मनोरुग्णालयात सारेच लेटलतीफ

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची कुलपे सकाळी आठपूर्वी उघडली जातात. त्यानंतर लगेच मनोरुग्णांची गर्दी होते. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ असल्याने सकाळी आठला मानसोपचारतज्ज्ञ (डॉक्‍टर) खुर्चीत दिसावेत, असा येथील प्रशासनाचा नियम. परंतु या नियमाला मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका, फार्मासिस्टनी छेद दिला आहे. सकाळी नऊच्या ठोक्‍यानंतर मनोरुग्णालयात कामकाजाला सुरवात होते. दर दिवसाला ‘अहो, डॉक्‍टर वेळेवर या...’ म्हणून शेकडो मनोरुग्णांची हाक असते. पण, कोणीच ‘ओ’ देत नाही.

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची कुलपे सकाळी आठपूर्वी उघडली जातात. त्यानंतर लगेच मनोरुग्णांची गर्दी होते. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ असल्याने सकाळी आठला मानसोपचारतज्ज्ञ (डॉक्‍टर) खुर्चीत दिसावेत, असा येथील प्रशासनाचा नियम. परंतु या नियमाला मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका, फार्मासिस्टनी छेद दिला आहे. सकाळी नऊच्या ठोक्‍यानंतर मनोरुग्णालयात कामकाजाला सुरवात होते. दर दिवसाला ‘अहो, डॉक्‍टर वेळेवर या...’ म्हणून शेकडो मनोरुग्णांची हाक असते. पण, कोणीच ‘ओ’ देत नाही. दरम्यान एखादवेळेस मनोरुग्ण विचलित झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, याची कल्पना मानसोपचारतज्ज्ञांना का बरे येऊ नये?

‘स्किझोफ्रेनिया’चा मानसिक विकार असलेला मनोरुग्ण चिडतो, हे येथील मानसोपचारतज्ज्ञांनाही माहीत आहे, तरीदेखील बाह्यरुग्ण विभागात येण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. स्किझोफ्रेनियाच्या पेशंटशी वागताना समजूतदारपणा दाखवायला हवा; परंतु डॉक्‍टरांच्या प्रतीक्षेत या रुग्णांमध्ये ताणतणाव वाढतो. ही बाब मनोरुग्णालयात साऱ्यांना ठाऊक आहे. मात्र, या मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांवर औषधोपचारासाठी डॉक्‍टर वेळेत का येत नाहीत, ही खंत येथील मनोरुग्णांचे नातेवाइक बोलून दाखवतात. ‘सकाळ’च्या बातमीदाराने सकाळी ८ वाजता प्रादेशिक मनोरुग्णालयात भेट दिली. येथील मुख्य द्वाराचे कुलूप तेवढे उघडले होते. मात्र पांढऱ्या कपड्यातील शिपायाव्यतिरिक्त कोणताही कर्मचारी वेळेत पोहोचला नव्हता. महिला चौकीदार ‘रुग्णांची गर्दी होते, रस्त्यावर थांबू नका’, असे आदेश देत मनोरुग्णांना खुर्चीवर बसण्याची विनंती करीत होती. 

औषधोपचार करण्यासाठी आलेल्या मनोरुग्णांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, डॉक्‍टरांवर थेट आरोप करण्यास सुरुवात झाली. बल्लारशा, अमरावती, चंद्रपूर, भंडाऱ्यापासून मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. डॉक्‍टर, परिचारिकांसह कोणताही कर्मचारी वेळेत येत नसल्याची चीड मनोरुग्णांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियांमधून दिसत होती. उशिरा येणाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच औषध घोटाळा झाल्याची चर्चा येथे होती, हे विशेष!

इंटरनेटपासून दुरावलेले बायोमेट्रिक
प्रादेशिक मनोरुग्णालयात वेळेत साऱ्या कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे, यासाठी बायोमेट्रिक हजेरी  प्रणाली लावण्यात आली. परंतु, ही प्रणाली इंटरनेटशी जोडली गेली नाही. यामुळे लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे फावत आहे. सारेच कर्मचारी उशिरा आल्यानंतरही याची प्रशासनाला खबरबात  नसते. यामुळेच सारे वेळ पाळत नाही. ही अजब कथा येथील बायोमेट्रिकची आहे.

बायोमेटिक लावले आहे. परंतु, ते इंटरनेटशी जुळले नाही. सकाळी डॉक्‍टर, परिचारिका येतात. उशिरा येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात प्रशासनातर्फे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, लवकरच बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली जाईल. मनोरुग्णांचे हित लक्षात घेत डॉक्‍टरांनी वेळेत यावे, हा नियम आहे. तो साऱ्यांनी पाळावा.
- डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

Web Title: nagpur news Regional Psychiatrists