फूटपाथ मोकळे करण्यासाठी मनपाचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - शहरातील फूटपाथ चालण्यायोग्य नसल्याबाबत महापालिकेच्या नतद्रष्टेपणावर बोट ठेवणारी वृत्तमालिका ‘सकाळ’ने प्रकाशित करताच अतिक्रमण विभागासह झोनमधील अधिकारीही खडबडून जागे झाले. दोन दिवसांत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासह झोन कार्यालयांनीही फूटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.

नागपूर - शहरातील फूटपाथ चालण्यायोग्य नसल्याबाबत महापालिकेच्या नतद्रष्टेपणावर बोट ठेवणारी वृत्तमालिका ‘सकाळ’ने प्रकाशित करताच अतिक्रमण विभागासह झोनमधील अधिकारीही खडबडून जागे झाले. दोन दिवसांत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासह झोन कार्यालयांनीही फूटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.

मागील वर्षी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने फूटपाथ मोकळे करण्यासोबत अतिक्रमण हटविण्याचेही निर्देश दिले. काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यानंतर कारवाईत सातत्य राहिले नाही. शहरातील फूटपाथ अतिक्रमणधारकांनी कवेत घेतले. मागील संपूर्ण आठवड्यात ‘सकाळ’ने शहरातील फूटपाथची दशा व दुर्दशा मांडणारी वृत्तमालिका ठळकपणे प्रकाशित केली. या वृत्तमालिकेची दखल घेत अतिक्रमण विभागासोबतच सतरंजीपुरा, महाल-गांधीबाग व आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. सोमवारी सतरंजीपुरा झोनने इतवारी व गांधीबाग येथील फूटपाथवरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविले. अनेक वर्षांपासून फूटपाथवरच असलेल्या भारत माता चौकात प्रथमच कारवाई करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही वेळातच फूटपाथवरील दुकानदारांनी आपले साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. यात जवळपास ३० ते ३५ अतिक्रमणधारकांना हटवून फूटपाथ मोकळा केला. भारत माता चौकानंतर जागनाथ बुधवारी, डागा हॉस्पिटल चौकातून पुन्हा परत याच परिसरात पथकाने धडक दिली. 

मनपा प्रवर्तन विभागाच्या इतर पथकाने आशीनगर झोनअंतर्गत गमदूर रेस्टॉरेंट चौकात कारवाई केली. कमाल चौक ते इंदोरा चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूचे फूटपाथ मोकळे करून अतिक्रमणधारकांना पिटाळून लावले. पुन्हा अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला. शुक्रवारी महाल, सिव्हिल लाइन्स येथील फूटपाथ मोकळे करण्यात आले. अतिक्रमणविरोधी पथकाने महाल परिसरातील कारवाईमुळे दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ माजली. 

अतिक्रमणधारकांची हकालपट्टी 
पथकाला पाहताच रस्त्याच्या कडेला आणि फूटपाथवर दुकाने थाटणाऱ्या हॉकर्सने पळ काढला. एका पथकाने बडकस चौकात तर दुसऱ्या पथकाने लकडगंज झोनअंतर्गत पारडी रोडपर्यंत फूटपाथ मोकळे  केले. कारवाईदरम्यान दोन्ही बाजूच्या फुटपाथवरील चहाटपरी, फळांची दुकाने, चर्मकारांची दुकानांसह काही अस्थायी बांधकाम हटविले. त्यानंतर झिरो माईल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक देत पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथवर जमलेल्या अतिक्रमणधारकांची हकालपट्टी केली.

Web Title: nagpur news sakal news impact